Blog | त्या बातम्या दाखवितातच कशाला..?

मला एक आश्चर्य वाटते, आपल्या सार्वजनिक जीवनात सक्रिय असणारे साऱ्या पक्षांतील नेते ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जातात म्हणजे नेमके कशासाठी जातात हे बिलकूल कळत नाही. शेती इथून तिथून सारखी. तेथील माती सारखी, अगदी अमेरिकेतही तिच्यावर पाऊस पडला की चिखलच होणार, त्यात पिके भिजली की सडणारच. अशी ही सार्वत्रिक नुकसानीची परिस्थिती असतांना जिथे जायला शेतकऱ्यांच्या अंगावर काटा येतो तेथे कॅमेरामॅनसह ही राजकीय मंडळी कशाला जात असतील ? बरं त्यांच्या बातम्या बघाव्यात तर एकजात सारख्या. कॅमेरा समोर नेता येतो. एकादा शेतकरी खाली पडलेले पिक दाखवतो. नेता अगदी अभ्यासू असल्यागत तो राडा बघतो व चेहऱ्यावर उद्गिवता आणत अरेरे किती वाईट झाले असे म्हणत, सत्ताधारी असेल तर किती हजार कोटी याचे आकडे जाहीर करतो व विरोधी असेल तर हे चालणार नाही, एवढी मदत द्यायलाच हवी अशी मागणी करतो. जणूू या दोन्ही मदती शेतकऱ्यांना मिळणारच आहेत या अज्ञानाच्या आनंदात शेेतकरी टीवि वर दिसणार म्हणून खूष होतो. आपल्या कारुण्याचा बाजार छानपैकी मांडणारा शेतकरी काही काळ तरी गावातला हिरो होतो. यात खरे जे करावयाचे ते पिकाचा उत्पादन खर्च व झालेल्या नुकसानीचा आकडा जो मंत्रालय वा तलाठ्याच्या घरीही काढता येतो, तो काढून जिल्हा पातळीवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला हवी. मात्र यात जाहीरात नाही, स्वतःला मिरवणे नाही, राजकीय फायदा नाही. शेतकऱ्यांच्या मनात मात्र एकाद्याच्या मैतीला आला होता अशा आठवणीसारखी, मागच्या अवकाळी पावसात आला होता, आता मत द्यायलाच हवे अशा उसनवारीफेडीत मत द्यायला बाध्य होतो. असे सोपोस्कार, मग ते लग्नांचे, मयतीचे, बारावेतेराव्याचे असोत वा दुष्काळी पहाणी असो, आपले लोकप्रतिनिधित्वाचे काम पार पाडले नाही तरी, पार पाडत नियमितपणे निवडणुका जिंकणारे अनेक पुढारी आहेत. शेतकरीही लग्नात टिळा लावावा वा फेटा बांधावा तसे इमाने इतबारे मतदान करीत असतात. या पाखंडीपणातून आम्ही कधी बाहेर येणार ? लेखक : गिरधर पाटील (सामाजिक-राजकीय अभ्यासक, नाशिक)
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*