Blog | खड्डे पर्यटनासाठी या महाराष्ट्रात..!

पर्यटक – वॉव… व्हॉट या बुटिफूल खड्डा इज थिस ना !!! गाईड – येस मॅडम… तुम्ही जो खड्डा पाहताय त्यामध्ये आमच्या मोठ्या साहेबांची गाडी आदळली होती. याच खड्ड्यापासून इथले लोक खड्ड्यात आदळायला सुरुवात झाली होती.
पर्यटक – आणि हा खड्डा ? गाईड – हा आदर्श खड्डा आहे मॅडम. आमचे एक साहेब या खड्ड्यात आदळले आणि थेट घरीच गेले
पर्यटक – हा खड्डा तर खूपच मोठा आहे. गाईड – एस मॅडम. हा खड्डा आमच्या छोट्या साहेबांचा. त्यांची गाडी एकदा यात आदळली होती. पण त्यांचं म्हणणं होतं काम जेवढं लांबेल तेवढाच खड्डा मोठा होईल, त्यामुळे आणखी काही काळ हा खड्डा तसाच राहू द्या.
पर्यटक – हा खड्डा ? हा कुणाचा? गाईड – या खड्ड्यात आमच्या राज्यातील एकमात्र वाघ आदळला होता. गाडी एवढी उंच उडाली कि त्यांचं डोकं छतावर आदळलं… त्यानंतर ते एवढे चिडले कि त्यांनी थेट काँक्रीट चाच रास्ता बांधला. पण, त्यावर पण आता खड्डे पडले आहेत. आणि खालून माहितीसुद्धा निघते आहे. मी तुम्हाला तिकडे पण घेऊन जाईल. त्या काँक्रीट च्या रस्त्यावर टोल उभारून त्यांनी आत्तापर्यंत घरातले कितीतरी खड्डे बुजवले आहेत.
पर्यटक – हा खड्डा कुणाचा ? गाईड – हा खड्डा आमच्या पंतप्रधान साहेबांसाठी राखून ठेवलेला आहे. कोणत्याही देशाचा दौरा करण्यापूर्वी या खड्ड्याचं दर्शन केल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. या खड्ड्यात त्यांनी आत्तापर्यंत कित्येकांना आदळवलं आहे.
पर्यटक – हा खड्डा खूपच क्रिएटिव्ह दिसतोय. अगदी लक्ष देऊन कोरल्यासारखा. गाईड – येस मॅडम. हा खड्डा आमच्या मराठी साहेबांचा… त्यांची गाडी एकदा खूपच जोरात आदळली होती त्यात. पण ते म्हणाले कि जोपर्यंत मला एकहाती सत्ता मिळत नाही तोपर्यंत हा खड्डा कुणीही बुजवायचा नाही. राह्यलं तसंच मग.
पर्यटक – आणि हे रस्त्यावर लहान लहान खड्डे कसले आहे ओ? गाईड – हे सगळे खड्डे आमच्या संपादक साहेबांनी खोदले आहेत. मागच्या दहा दिवसांपासून ते आपल्या मित्रपक्षावर ते एवढे रागावले आहेत कि हातात टिकाव घेऊन ते रस्त्यावर जिथेतिथे जोरजोरात मारून, खड्डे तयार करत आहेत. खड्डे लहान दिसले तरी लई जणांच्या गाड्या आदळल्यात त्यात आत्तापर्यंत.
पर्यटक – हा खड्डा हसत असल्यासारखा का दिसतोय ? गाईड – यात आमचे कवी आदळले होते. पडल्यावर ते म्हणाले — हा आहे खड्डा… हा आहे खड्डा… आणि मी त्यात पड्डा… तेव्हापासून हा खड्डा सुद्धा हसतानाच दिसतोय.
पर्यटक – हा खड्डा असा Attitude मधे का दिसतोय ? गाईड – मॅडम त्यात आमचे एक विदर्भातील साहेब आदळले होते. साहेब एकदा त्यात आदळले आणि एवढे चिडले कि त्यांनी थेट त्यावर गुन्हा दाखल करण्याचीच धमकी दिली. पण नंतर त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि त्यांनी आणखी दहा वीस खड्डे खणून सगळ्या खड्ड्यांना त्यांच्या जातीचे लेबल लावले आणि मग प्रत्येकात आदळत आदळत पुढे गेले. तेव्हापासून खड्ड्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तेही Attitude दाखवायला लागले…
पर्यटक – आणि हा शेवटचा खड्डा कुणाचा ? गाईड – मॅडम या खड्ड्यात आमचे मुख्यमंत्री साहेब आदळले होते. एवढे जोरात आदळले कि त्यांच्या गाडीचं तयार फुटलं, ऍक्सल तुटलं, गाडीचे दोन चार पार्ट खाली पडले… पर्यटक – मग तुम्ही खड्डा दुरुस्त का नाही केला…?
गाईड – आम्ही खड्डा दुरुस्त करणारच होतो, पण साहेब लगेच म्हणाले – खड्डा बजावू नका, त्यात आदळण्यासाठी मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल…
वॉव… खरंच काय सुंदर खड्डे आहेत ना तुमच्या राज्यात… मला तर खूपच आवडले. मॅडम हे तर काहीच नाही. तुम्ही आता पुढच्या रस्त्याला लागा. आगळिकडे फक्त खड्डे आहेत. नई माघारी जाईपर्यंत तुमची पाठ दुखायला लागली ना, म्हणाल ती पैज हरायला तयार आहे मी. लेखक : श्रीकांत आव्हाड, अहमदनगर
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*