Blog | त्यात डावे-उजवे काहीच नसते, तर..!

काही प्रथितयश आणि आपल्या कामात सर्वोत्तम असलेले डॉक्टर्स आणि इंजिनियर्स चित्रकला, नाट्यकला, गायन-अभिनय-नृत्य-लेखन इत्यादी कलांमध्येही कसे काय निपुण असतात हा मला बर्‍याच वर्षांपासून पडलेला प्रश्न होता. त्याला कारण म्हणजे एक तर हे की विज्ञान-गणित ह्या क्षेत्रांमध्ये काम करणारे प्रचंड हुशार वगैरे असतात आणि कला क्षेत्रातले तेवढे काही हुशार नसतात, अभ्यासात ढ असतात असा समज सर्वसाधारणपणे गेल्या कैक वर्षांपासून जनसामान्यांत पसरलेला आहे. त्यानंतर मागच्या काही वर्षांत पुढे आले की माणसाचा उजवा मेंदू हा सृजनात्मक आणि कलेशी संबंधित कामांमध्ये चांगला असतो आणि डावा मेंदू हा विश्लेषणात्मक, गणिती कामांत उत्तम असतो. त्यामुळे जी माणसे कलाकार असतात त्यांचा उजवा मेंदू जास्त प्रभावशाली असतो आणि गणितज्ञ-अभियंता-वैद्यक यांचा डावा मेंदू प्रभावशाली असतो. त्यामुळे व्यक्तीवर डाव्या किंवा उजव्या मेंदूचे प्रभुत्व असते व त्यानुसार त्यांची विचारशैली, आकलन आणि इतर क्षमता विकसित झालेल्या असतात. कलाकार व्यक्ती ही अभियंत्यापेक्षा वेगळ्या मेंदूची असते आणि गणितज्ञ हा कलेच्या बाबतीत ढ असतो असे काहीसे अति करणारे समज समाजात आहेत. ह्यानुसार शाळांमधून, शैक्षणिक संस्थांमधून आणि समुपदेशकांमधूनही ह्याच समजाच्या आधारावर विद्यार्थ्यांचे आकलन व मार्गदर्शन केले जात आहे.

पण गेल्या काही वर्षांत माझ्या वाचनात काही तुटक तुटक संदर्भ येऊ लागले. तेव्हा समजू लागले की कला आणि गणित हे साधारण एकाच स्वरुपाचे शास्त्र आहे. गणितज्ञाचा मेंदू ज्या प्रकारे एखाद्या समस्येचे आकलन करुन गणित सोडवतो त्याच प्रकारे कलाकाराचा मेंदू एखादी कलाकृती साकार करत असतो. गणित हा एक कलेतलाच भाग आहे हेही समोर येऊ लागले. अनेक गणितज्ञांनी कलेच्या प्रांतात काम केले आहे ही माहितीसुद्धा मिळाली. त्यापैकी लिओनार्दो दा विंची हा गणितज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक आणि कलाकार असामी एक गाजलेले नाव आहे. अनेक शास्त्रज्ञ, अभियंते आणि डॉक्टर्स कलेच्या प्रांतात नुसती मुशाफिरी करत नाहीत तर नाव गाजवून आहेत हेही आपल्याला माहिती आहे. आपला मेंदू बराच गुंतागुंतीवाला मामला आहे.

अशावेळी मला प्रश्न पडला होताच की हे मेंदूचं डावे-उजवेपण प्रकार काही योग्य वाटत नाहीये. आता हा लेख लिहिण्याला कारण असे की परवाच एक लेक्चर ऐकत असतांना कळले की डावा मेंदू विरुद्ध उजवा मेंदू आणि कला विरुद्ध सांख्यिकी-विश्लेषण अशी विभागणी करणारा समज एका विस्तृत संशोधनाच्या आधारे मोडीत काढण्यात आला आहे. मग मात्र माझ्या अंदाजाला ठाम पुष्टी मिळाली. जेअर्ड निल्सन आणि त्यांच्या चमूने ७ वर्षे ते २९ वर्षे वयोगटातल्या सुमारे एक हजार व्यक्तिंच्या मेंदूंच्या वेगवेगळ्या भागांवर प्रयोग करुन हा निष्कर्ष काढला की लेफ्ट-ब्रेन-डॉमिनंट किंवा राइट-ब्रेन-डॉमिनंट असे काहीही नसते.

डावा मेंदू हा समस्यानिवारण, भाषा आणि संवादाच्या दृष्टीने काम करतो तर उजवा मेंदू दृश्यात्मक बाबतीत काम करतो. ह्या दोहोंच्या मध्ये एक संदेशवहनाच्या पुलाचे काम करणारी एक मज्जातंतूंची वाहिनी असते जिच्या आधारे दोन्ही मेंदूंच्या संयुक्त विद्यमाने आपले रोजचे काम चालू राहत असते. ह्यासंदर्भात नोबेल विजेते रॉजर स्पॅरी यांनी १९५० मध्ये एक वेगळाच प्रयोग केला होता. अपस्मार म्हणजे फेफर्‍यांच्या रुग्णांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करुन त्यांच्या दोन्ही मेंदूंना जोडणारी मज्जातंतूंची वाहिनी काढून टाकली जात असे. ह्याने त्या रुग्णांना आपले जीवन सामान्यपणे जगण्यास मदत होत असे. अशा रुग्णांच्या दोन्ही मेंदूंमध्ये कोणताही संपर्क नसला तरी त्यांना फारसा काही त्रास होत नसे. ह्या अवस्थेचा उपयोग करावा असा ठरवून रॉजर स्पॅरी यांनी केवळ उजव्या मेंदूलाच किंवा डाव्या मेंदूलाच वेगवेगळी सूचना जाईल अशा पद्धती शोधून काढल्या. त्यानंतर त्याचा वापर करुन काही प्रयोग करण्यात आले. ह्यात रुग्णाला दोन वेगवेगळी चित्रे दाखवण्यात येत असत आणि त्या चित्राशी संबंधित उजव्या हाताला व डाव्या हाताला ठेवलेल्या प्रत्येकी चार चार कार्डमधून एक कार्ड निवडायला लागत असे. दोन्ही मेंदू सर्व कार्ड्स बघू शकत असत. केलेल्या निवडीवर एखादा प्रश्न विचारुन त्यावर आलेल्या उत्तरानुसार निष्कर्ष काढण्यात येत असत. एका रुग्णाला डाव्या बाजूने बर्फवृष्टीचे चित्र दाखवले तर उजव्या बाजूने कोंबडीच्या पायाचे चित्र दाखवले. त्यानुसार उजव्या मेंदूने (जो शरिराचा डावा भाग नियंत्रित करतो) बर्फ हटवण्याचे फावडे निवडले तर डाव्या मेंदूने कोंबडीचे चित्र निवडले. त्यानंतर त्याला विचारण्यात आले की अशी निवड का केली तर तो म्हणाला की फावड्याने तो कोंबड्यांचे खुराडे साफ करणार आहे. आता ही भाषा वापरुन उत्तर देण्याची क्षमता डाव्या मेंदूकडेच असल्याने उजव्या मेंदूने ते फावडे का उचलले असावे ह्याचा डाव्या मेंदूला काही पत्ताच नव्हता. त्यामुळे डाव्या मेंदूला जे कोंबडीचे चित्र दिसत होते त्यानुसार त्याने उत्तर दिले कोंबडीचे खुराडे फावड्याने साफ करणार आहे. हे जरा समजायला किचकट वाटत असले तर कमेंटमध्ये दिलेल्या लिंक्स बघाव्यात.

ह्यावरुन असे लक्षात येते की आपण जे काही करतो, बोलतो त्यात दोन्ही मेंदूच्या क्षमतांचा वापर केला जात असतो. ह्यासंदर्भात ओशोंच्या ‘अध्यात्म उपनिषदा’वर असलेल्या एका प्रवचनात वेगळाच उलगडा होतो. ओशो सांगतात की कोणत्याही वस्तूविषयासंदर्भात जगभरात सामान्यपणे सत्य आणि असत्य दोन बाजू असतात असे समजले जाते. पण आपले थोर भारतीय तत्त्वज्ञ इतके हुशार आहेत की त्यांनी एक तिसरी बाजू शोधून काढली ती म्हणजे ‘मिथ्या’. मिथ्या म्हणजे जी पूर्णपणे असत्यही नाही आणि पूर्णपणे सत्यही नाही. ह्या दोहोंच्या अध्येमध्ये कुठेतरी आहे. ह्याचे उदाहरण देतांना त्यांनी सांगितले की समजा तुम्ही अंधार्‍या बोळीतून जात आहात आणि अचानक तुम्हाला एक भला मोठा साप रस्त्यात पसरलेला दिसतो. तुम्ही घाबरुन बाहेर धूम ठोकता. इतर लोक तुम्हाला विचारतात काय झाले? तेव्हा ते तुमच्या सांगण्यावरुन सापाला मारायला म्हणून लाठ्याकाठ्या, कंदिल घेऊन येतात. येऊन बघतात तो काय, तो काही सापबिप नाही, एक निर्जिव दोरखंड पडलेला आहे. लोक तुम्हाला वेड्यात काढतात. ‘काय दोर बघून घाबरला?’. आता तुम्ही साप पाहिला हे तुमच्यासाठी सत्य असते, पण लोकांसाठी मात्र दोरखंड सत्य असतो. तुमचा साप त्यांच्यासाठी असत्य असतो पण दोरखंड तुमच्यासाठी असत्य असतो. आता हे झाले कसे काय? ह्याच डोळ्यांनी तर तुम्ही साप बघून धूम ठोकली होतीत. मग तो साप कसा काय खोटा असेल? तुमच्या डोळ्यांना साप दिसला होताच, तो खोटा नव्हता. भले तिथे दोरखंड असेल पण तुम्ही मात्र साप बघितला. तुमचा अनुभव खोटा नाही. तो साप ‘मिथ्या’ आहे. भास आहे. आता रॉजर स्पॅरी यांच्या प्रयोगातल्या निष्कर्षानुसार ओशो निर्देशित करत असलेला ‘भास’ कुठून उत्पन्न झाला ह्याचा आपण अंदाज लावू शकतो.

ओशोंनी सांगितलेले उदाहरण आणि दुभंगित-मेंदू रुग्णांचा अनुभव बघता आपण अशा निष्कर्षावर येऊ शकतो की मेंदूच्या दोन्ही भागांची काम करण्याची वेगवेगळी क्षमता ही आपल्या विचारप्रणाली आणि आकलनावर प्रभाव टाकत असते. त्यामुळेच जे दिसते ते का दिसते व जे वाटते ते का वाटते ह्याचे शंभर टक्के स्पष्टीकरण देणे शक्य होत नसते.

सरतेशेवटी जिथून हा लेख सुरु केला तिथेच येतो. पाब्लो पिकासोने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक लहान मुलात एक कलाकार दडलेला असतो, पण मोठा होईपर्यंत तो टिकवून ठेवणे बहुतेकांना शक्य होत नाही. मलाही असेच वाटते की प्रत्येक व्यक्तीत एक कलाकार असतोच असतो. त्याला मुक्तपणे व्यक्त होऊ देणे जास्त महत्त्वाचे असते. शिक्षण संस्था, समुपदेशक आणि पालक यांनी मुलांच्या शिक्षण किंवा करिअरचा विचार करतांना राइटब्रेन-लेफ्टब्रेन असे सुलभीकरण करु नये किंवा कला आणि विज्ञान ह्या क्षेत्रांत सरसकट भेदभाव करु नये. दोन्ही क्षेत्रांत काम करतांना बुद्धीचा-श्रमांचा कस लागत असतोच. दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांच्या बुद्धीत किंवा हुशारीत उजवे-डावे काही नसते.

लेख थोडा विस्कळीत वाटत असल्यास क्षमस्व,
लेखक : संदीप डांगे, नाशिक

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*