Blog | शिवसेना हा ‘ट्रोजन हाॅर्स’..!

धर्मनिरपेक्ष पक्षांच्या तंबूत हा ट्रोजन हाॅर्स पाठवायचं नियोजन केव्हाच झालं होतं. त्याची अंमलबजावणी आज होताना दिसतेय. खरं नाही ना वाटतं? वाचून पाहा म्हणजे सगळं समजेल. याची सुरवात बाळासाहेब होते तेव्हाच झाली होती. (कुठले ते आम्ही सांगणार नाही!) तर ठरलं असं होतं की अहंकार आणि सत्तेचा दर्प महाराष्ट्रात भाजपला जेव्हा पूर्ण आंधळा करेल त्या क्षणी ही योजना कार्यान्वीत होईल. याच कारण उघड होतं. हिंदूराष्ट्राच्या निर्मितीच्या ग्रॅंड प्लॅनमध्ये कुठलाही अडथळा येणं ‘त्यांना’ परवडणारं नव्हतं. भाजप हा एक मार्ग आहे त्यांच्यासाठी. पण एकमेव नाही. भाजपला सत्तेपासून रोखून त्यांच्यावर अंकुश ठेवणं, धर्मनिरपेक्ष पक्षांना हिंदुत्वाच्या सापळ्यात अडकवणं आणि डाव्यांना शिवसेनेला पाठिंबा द्यायला भाग पाडून उघडं पाडणं असे अंतस्थ हेतू ठेवून योजना आखण्यात आली. निकाल लागला आणि अपेक्षेनुसार-योजनेनुसार जे घडायचं होतं ते घडलं. शिवसेनेच्या हातात सूत्रं गेली. यात भाजपच्या अंतर्गत मोहऱ्यांचाही वापर करण्यात आला. धूर्त व डावपेचांसाठी प्रसिद्ध नेत्याची तीच कमकुवत जागा हेरण्यात आली. ‘ट्रोजन हाॅर्स’चं पहिलं पाऊल पडलं ते निकालाच्याच दिवशी. पुढे जे घडलं ते सगळ्यांनाच माहित आहे. केंद्रातून कुणी मदतीला येणार नाही याची दक्षताही ‘त्यांनी’ घेतली. परिस्थिती अशी निर्माण करण्यात आली की भाजपच्या राज्यातल्या नेत्याला हात चोळत बसावं लागलं. राज्यपालांनी शिवेसेनेला दिलेली २४ तासांची मुदत ही ‘ट्रोजन हाॅर्स’ला तंबूत घेण्यापूर्वी काँग्रेसला विचार करायला अजिबात वेळ मिळू नये यासाठीच होती. राज्यपालांच्या काळ्या टोपीचा उल्लेख करणाऱ्यांना हे कळलं नाही की त्यांना तो निर्णय शिवसेनेसाठीच घेतला होता. काँग्रेसचं घड्याळ सेकंद आणि मिनिटांचं नसून दिवस आणि महिन्यांचं असतं ही बाब या तुफान योजनेत लक्षात घेण्यात आली नाही. तिथं थोडं गणित चुकलं. या ग्रँड योजनांमध्ये प्लान बीही तयार होताच. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी आता जणू काँग्रेस व राष्ट्रवादीचीच आहे असं वातावरण तयार करणं हा त्याचा पहिला भाग. दिल्लीतला आणि मुंबईतला निवडक मीडिया अॅक्टिव्हेट करण्यात आला. नोव्हेंबर अखेर ‘ट्रोजन हाॅर्स’ तंबूत शिरला नाही तर काय या प्रश्नाचं उत्तर प्लान सी मध्ये आहे. ते यथावकाश दिसेलच.
पूर्ण योजना ऐकली तर डोळे पांढरे होतील. सेना हिंदुत्वाचे सगळे मुद्दे गुंडाळून ठेवणार आणि सत्ता मिळविणार. आणि काही राज्यांतल्या महत्त्वाच्या निवडणुकांच्या वेळी असे डावपेच खेळले जाणार की पुन्हा हिंदुत्व हाच मुद्दा चर्चेत यावा. महाराष्ट्र भाजपला ‘चड्डीत’ ठेवून केंद्र भाजपला अन्य राज्यांत वाचवण्याचं आणि सेनेला महाराष्ट्रात मोठं करण्याचं हे गणित भल्याभल्यांना चक्रावून टाकणारं आहे. केंद्रातल्या दोन आणि राज्यातल्या एका चाणक्यालाही ही ‘रेशीमगाठ’ समजली नाही. ती उकलली फक्त एकाच महाचाणक्याला- तो म्हणजे मी. या सनसनीखेज योजनेचा जनक मीच आहे. आणि तुम्ही या वाचक योजनेचे सन्माननीय सदस्य आहात. तर मित्रांनो, ही योजना कशी वाटली ते मला जरूर कळवा. आवडली तर लाइक करा, शेअर करा. पण काँग्रेसवाल्यांना सेना हा ट्रोजन हाॅर्स आहे ते कृपया सांगू नका. (इतकं जमवलेलं बिघडायचं उगाच.) भेटूया पुन्हा. नव्या थेरासह. साॅरी थेरीसह! (रोज वेगवेगळ्या चाणक्यांविषयी पोस्ट लिहिणाऱ्या आणि त्यांचे सगळे डावपेच जगजाहीर करणाऱ्या धुरंधर फेसबुकींना ही पोस्ट समर्पित!) या योजनेवर माझा काॅपीराइट आहे. योजना वापरण्यापूर्वी संपर्क करा… लेखक : दीनदयाळ वैद्य, पुणे
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*