तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट : राज्यपाल

मुंबई :

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

आवास दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री. कोश्यारी बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्राम विकास विभागाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण, राज्य व्यवस्थापन कक्षाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशातील गरिब, मजदुर यांच्यासाठी गेल्या पाच वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबविल्या. ज्यांच्याकडे बँक खाते नाही, अशा देशभरातील सुमारे 30 कोटीहून अधिक नागरिकांचे बँकेत खाते उघडून दिले. प्रत्येक घरात शौचालय पोचविण्याचे काम या काळात झाले. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरात वीज व विद्युत दिवे पोचविण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. वीज पोचू न शकणाऱ्या दुर्गम भागातही सौरऊर्जेद्वारे घरांमध्ये प्रकाश निर्माण करण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी प्रयत्न केले.

प्रत्येक घरात शौचालय योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याची योजना सुरू करणार आहे. ही योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, राज्यात गेल्या तीन वर्षात 4.50 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 3.66 लाख घरे बांधण्यात आली असून आदिवासी विभागामार्फतही विविध योजनेतून मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*