कारवाई टाळा; राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाचे आवाहन

मुंबई : 

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सातत्याने कर कसूरदार व्यापाऱ्यांकडे विवरणपत्र व कर भरण्यासंदर्भात पाठपुरवा करत असतो. त्याअनुषंगाने विभागाने एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये वस्तू आणि सेवा कर विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या करदात्यांपैकी अनेक करदात्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जीएसटीआर-३-B हे विवरणपत्र भरल्याचे दिसून आले नाही. यामुळे त्याच्या खरेदीदाराला त्याने दिलेल्या कराची वजावट मिळत नाही शिवाय त्याचा राज्य करसंकलनावर ही परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन वस्तू आणि सेवा कर विभागाने अशा व्यापाऱ्यांना थकित कर आणि विवरणपत्र भरण्याबाबत आवाहन केले आहे.

नोंदणी दाखला

जे नोंदणीकृत करदाते अशी 6 च्या वर विवरणपत्रे भरणार नाहीत व थकित कर भरणार नाहीत त्यांचा नोंदणी दाखला रद्द करण्यात येणार असल्याचे वस्तू आणि सेवा कर विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच जे व्यापारी दाखवलेल्या जागी व्यवसाय करत नाहीत असे आढळून येईल त्यांचाही नोंदणी दाखला रद्द करण्यात येणार आहे.

एकतर्फी निर्धारणा

या दोन निकषात न बसणाऱ्या व विवरणपत्र कसुरदार असणाऱ्या करदात्यांविरूद्ध एकतर्फी निर्धारणा आदेश पारीत करण्यात येईल असे विभागाने  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. गेल्या दोन महिन्यात जवळजवळ १८ हजार नोंदणी दाखले रद्द केल्याचे तर  ६५ हजार करदात्यांना नोंदणी दाखला रद्द का करू नये अशा आशयाच्या नोटीस बजावण्यात आल्याची माहिती ही विभागाने दिली आहे

विवरणपत्र आणि थकित कर भरा… व्यवसाय सुरळित ठेवा

वस्तू आणि सेवा कर कायद्यामध्ये जर करदात्याने विवरणपत्र दाखल केले नाही तर त्याच्या खरेदीदारास दिलेल्या कराची वजावट मिळत नाही पर्यायाने अशा कर कसुरदार विक्रेत्यांकडून खरेदीदार पुढील कालावधीत खरेदी करणार नाही. त्यामुळे व्यवसाय सुरळीत राहण्यासाठी व व्यवसाय वाढवण्यासाठी विवरणपत्र जीएसटीआर-३-B भरणे हिताचे आहे. अन्यथा येत्या पंधरवाड्यात कर कसुरदारांविरुद्ध नोंदणी दाखला रद्द करणे, एकतर्फी निर्धारणा करणे अशी कारवाई करण्यात येईल. ही अप्रिय कारवाई टाळण्यासाठी नोंदणीकृत करदात्यांनी जीएसटीआर-३-B  हे मासिक विवरणपत्र  व  थकित कर त्वरित भरावा  असे आवाहन ही वस्तू आणि सेवाकर आयुक्तांनी केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*