BLOG | तीच तार होती भविष्याची नांदी..!

तुटपुंज्या टीनपाट आयुष्यात इतके अतरंगी अनुभव आले आहेत ना की कोणाला सांगावे तर भरोसा येत नाही…

लेखक : संदीप डांगे, नाशिक.

तर मातोश्री पासून पाचशे फुटावर आमचे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स चे हॉस्टेल आहे. दरवर्षी हॉस्टेलचा गणपती उत्सव असतो. आणि मी फायनल इयरला असतांना त्या वर्षी उत्सवाचा प्रमुख मी होतो. तेव्हा सर्वाना उत्सवाचे आमंत्रण देण्याची जबाबदारी आयोजनप्रमुख म्हणून माझीच होती. आमंत्रण पत्रिका छापून आणल्या आणि मग कलानगर परिसरात शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये वाटायला सुरुवात केली. शेजार म्हणजे काय तर डाव्या बाजूला साहित्य सहवास आणि उजव्या बाजूला मातोश्री.

साहित्य सहवास मध्ये चार पाच मोठ्या लेखकांना प्रत्यक्ष भेटता आले. सर्वात भारी तर विंदांचा अनुभव. विंदाना उत्सवाचे उद्घाटक म्हणून आमंत्रण देण्यास मी आणि दोन तीन मित्र गेलो. विंदांनी पत्रिका हातात घेतली. बसायला लावले. चष्मा काढला, पत्रिकेकडे बघितले आणि माझ्या हातात देऊन मला म्हणाले, ‘हे काय लिहिले आहे ते तुला वाचता येते आहे का?’ पत्रिका मीच डिझाईन केली होती, मजकूर हस्ताक्षरात छापला होता पण त्याचा font खूपच बारीक होता. वयोवृद्ध लोकांना सहज वाचता येईल असा नव्हता. त्यामुळे विंदा चिडले होते… तरी बैठक शांतपणे संपली, त्यांनी वयोमानाने कार्यक्रम करत नसल्याने उत्सवाला येऊ शकणार नाही असे कळवले.

व.पु. काळेंच्या flatच्या दारावरची बेल वाजवल्यावर कोण्या स्त्रीने दरवाजा उघडला, आणि अर्ध्या क्षणाचाही विलंब न करता.. ‘नको नको, आम्हाला काही विकत घ्यायचे नाही..’ असे घाई घाईने म्हणून दरवाजा लावू लागली… मी म्हटले अहो, आम्ही आमंत्रण द्यायला आलोय… त्यांना नीट समजवून सांगितले. मी त्या काळात पांढरा कुर्ता घालत असे आणि दाढी वाढवलेली होती.

कोणीतरी बाळ का गंगाधर अशा नावाचे खूप वयोवृद्ध लेखक होते. साहित्य सहवासात माणसांच्या सहवासाला मात्र पारखे झाले असावेत. त्यांनी आम्हाला गप्पा मरायला बसवूनच घेतले… आम्ही पण अर्धा तास बसलो.

ह्या सगळ्यांपेक्षा मातोश्रीतला अनुभव म्हणजे भयंकर वेगळाच. नेमके त्याच दिवसांत नारायण राणेंनी बंड पुकारून पक्षत्याग केला होता. मातोश्रीकडे बऱ्याच लोकांची लगबग सुरु होती. वातावरण तणावाचे होते… मी आणि माझे दोन चार मित्र आमंत्रण पत्रिका घेऊन थेट मातोश्री बंगल्यात जाऊ लागलो. कोणीही अडवले नाही, काही विचारले नाही. आता माझा अवतार एखाद्या शिवसैनिकासारखा असल्याने बहुतेक मी कोणीतरी नेता असून बाळासाहेब ठाकरेंना आपण तुमच्यासोबत आहोत असा निरोप द्यायला आला असावा अशी त्यांची समजूत झाली असावी. आम्ही थेट जाऊन मातोश्रीच्या हॉल मध्ये बसलो होतो. पाच मिनिटात दोन तीन लोकांनी विचारले काय काम आहे. मी म्हटले ‘बाळासाहेबांना’ गणपती उत्सवाचे आमंत्रण द्यायचे आहे. मग दोन तीन मिनिटांनी कोणी manager टाईप तरुण आला. त्याने सर्व माहिती घेतली. मग तो वर गेला. मग परत आला. म्हणाला कि ‘तुम्ही आमंत्रण पत्रिका माझ्याकडे द्या, मी ती उद्धव साहेबांकडे देतो, पण उद्धवसाहेबाना शक्य होणार नाही कार्यक्रमाला यायला’ मी म्हटले पण आम्हाला ‘बाळासाहेबांना’ भेटायचे आहे ना… तो भाऊ काही ऐकत नव्हता, फक्त उद्धव उद्धव करत होता. आम्ही तसेच परतलो. त्या काळात राजकारणाचा एवढा काही गंध नव्हता मला, पण त्या दिवशी मला जाणवले होते की ‘मातोश्री’ आणि ‘शिवसेना’ बाळासाहेबांच्या हातात नसून उद्धव च्या हातात आहे. पुढे डिसेंबर महिन्यात राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यावर त्यामागचे कारण लक्षात यायला वेळ लागला नाही…

*फेसबुक पोस्टवरून साभार

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*