BLOG | विधानसभा निवडणूक ताळेबंद; वाचा विशेष असे टिपण..!

विधानसभा निवडणूक निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी यावर अनेकांनी आपापल्या पद्धतीने काहीतरी लिहिले. अनेकांनी ते वाचून आपलाही विचार टायर केला. मात्र, एकूण राजकीय पक्षांना यामुळे काय हाती आले याचा मुद्देसूद आढावा अहमदनगर येथील सामाजिक, आर्थिक व राजकीय अभ्यासक आनंद शितोळे यांनी घेतला आहे. वाचा सविस्तर..

भाजप

अहंकार आणि आत्मविश्वास यामधली सीमारेषा धूसर असते.ती कळायला पाय आणि नजर जमिनीवर असायला हवीय.

३७० च्या गदारोळात , राष्ट्रवादाच्या अफूने लोकसभा जिंकली तशीच विधानसभा सहजच मारू , समोर सगळेच गर्भगळीत विरोधक असताना आपला विजय नक्की अस वातावरण आपल्याच माणसात भाजपने निर्माण केल आणि त्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी मधून येनकेनप्रकारेण नेते आयात करण्याचा सपाटा लावला.जुन्या ३० वर्षाच्या मित्राला जागावाटपात जमेल तेवढ चेपल आणि चिल्लर मित्रपक्ष स्वतःचा एबी फॉर्म देऊन उभे केले.या सगळ्यात भाजपला मुलभूत गोष्टीचा विसर पडला तो म्हणजे राज्यातल्या प्रश्नाचा आणि त्यावर सरकारच्या उत्तराचा.लोकांना सरकारने सगळे प्रश्न सोडवले नाहीत तर चालत पण किमान आपल म्हणन ऐकून घ्याव आणि समजून घ्याव, सोबत उभ रहाव हि अपेक्षा असते.सरकार या पातळीवर सपशेल अपयशी ठरल.एकेक मंत्र्यांचे कारनामे आणि जोडीला बटिक माध्यम आणि अक्राळविक्राळ आयटी सेल.या सगळ्यातून फडणवीसांची लार्जर प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला.मात्र फडणवीस प्रती मोदी बनायला गेले.’ मी पुन्हा येईन ‘ घोषणेत असलेला ‘ मी ‘ सगळ्यात जास्त नडला.त्यात फडणवीसांची आपल्या मार्गातले संभाव्य प्रतिस्पर्धी बाजूला करण्याची कुटीलनीती फडणवीसना कधी एकट पाडल हेही समजल नाही.हा उन्माद हा माज लोकांना दिसत होता.जनतेला माज ,उन्माद चालत नाही हे २०१४ ला कॉंग्रेसला घरी बसवून दाखवलेलं असूनही फडणवीस काहीच धडा शिकले नाहीत.स्ट्राईक रेट च्या गप्पा कितीही मारल्या तरीही एवढ सगळ बरोबर असताना भाजपचा घोडा सव्वाशे ची मजल गाठू शकला नाही हे फक्त फडणीसांच्या मुळे.

शिवसेना

अहंकार आणि स्वाभिमान यामध्ये फरक असतो तसाच लाचारी आणि लवचीकपणा यामध्येही असतो.

हा फरक उद्धवना फार लवकर समजला आणि त्याचबरोबर भाजपचा दगाफटका झाल्याने किमान १५ आमदार कमी झाले हेही लक्षात आल.विधानसभेला नव्याने पक्षात आलेल्या लोकांच्या मदतीने पाच वर्षांची सत्ता असूनही सेना ६० चा आकडा गाठू शकली नाही याला कारणीभूत सत्तेत राहूनही विरोधी बोलण्याची चूक आणि धरसोड.लोकसभेला दिलेली आश्वासन भाजप सोयीस्करपणे विसरला आणि उद्धव ठाकरेंनी परतीचे दोर शाबूत ठेवून संजय राउत मैदानात उतरवले.राउत एकीकडे भाजपची पिस काढत असतानाच दुसरीकडे नव्या समीकरणांची मांडणी करत होते.जेव्हा विधानसभा कार्यकाळ संपला आणि सेनेला भाजप मुख्यमंत्रीपद देणार नाही याची स्पष्ट कल्पना आली तिथूनच उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला आणि हि महाआघाडी अस्तित्वात आली.किमान सामायिक कार्यक्रम तयार करताना तेवढीच लवचिकता त्यांनी दाखवली.हिंदुत्व कि मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र राज्य यामधून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला.८० तासांच्या फडणवीस सरकारच्या काळातही उद्धव ठाकरेंनी दोन्ही कॉंग्रेसवर आणि त्यांनी ठाकरेंवर विश्वास ठेवला आणि एकजुटीने लढाई जिंकली.

कॉंग्रेस

युवक कॉंग्रेसच्या टीमने केलेल्या कामाच्या दहा टक्के काम मोठ्या नेत्यांनी केल असत आणि केंद्रातले नेते प्रचाराला येऊन रसद पुरवली असती तर दोन्ही कॉंग्रेस मिळून अजून किमान २५ आमदार नक्कीच वाढले असते.कॉंग्रेस सुरुवातीपासून हरलेल्या मानसिकतेमध्ये होती.पवारांचा झंझावात सुरु झाल्यावरही कॉंग्रेस ढिम्म राहिली मात्र जेव्हा सत्ता नजरेच्या टप्प्यात आली तेव्हा शीतनिद्रेत गेलेले सगळे दरबारी राजकारणी जागे झाले आणि बैठका नावाचा उबग आणणारा प्रकार सुरु झाला.
२०२४ च्या लोकसभेला कॉंग्रेसला भाजपशी टक्कर घ्यायची असेल तर महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करून या आमदारांना किमान स्वतः च्या आणि आजूबाजूच्या दोन तीन मतदारसंघाची जबाबदारी देऊन बांधणी करायला हवी.नव्याने पक्षबांधणीसाठी माणस जोडायला हवीत.अन्यथा २०२४ ला गाड्याबरोबर नळ्याची यात्रा घडवायला पवार साहेब कितीवेळा यांचा बोजा उचलणार आणि का उचलणार ?

राष्ट्रवादी

इडीची नोटीस-पवारांच त्याला उत्तर आणि त्यानंतर झंझावात ,पावसातली सभा याबद्दल भरपूर लिहून झालेलं आहे.तरुणाई इतक्या मोठ्या संख्येने ८० वर्षाच्या माणसाच्या मागे का उभी राहिली हा अभ्यासाचा विषय आहे.मात्र राष्ट्रवादी आज सगळ्यात भक्कम भासत असली तरी हा डोलारा पवारांना किती दिवस सांभाळायला लावणार ? राज्यभरात आश्वासक, खात्रीशीर आणि लोकांमध्ये विश्वास आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे सामान्य लोकांच प्रेम असलेला नेता, किंबहुना नेत्यांची फळी कधी समोर येणार ? पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या नेत्यांवर प्रेम करतात त्यातले बरेचसे लाभार्थी असतात हे कटू वाटल तरी सत्य आहे.थोरल्या पवारांच्या मागे असा कुठलाही लाभ नसलेली जुनीजाणती माणस यावेळेला भक्कम उभी राहिली कारण गेल्या पन्नास वर्षात पवारांनी माणस पेरली,जपली आणि वाढवली.राष्ट्रवादी मध्ये हि मशागत करणार पुढल्या काळात कोण आहे ? या निवडणुकीत आणि नंतरच्या राजकारणात पवारांनी आपली विश्वासर्हता वाढवली आणि टिकवली.खरी कसोटी राष्ट्रवादी पक्षाची आहे, अन्यथा पवारांची सक्रीय राजकारणातून आज ना उद्या निवृत्ती झाल्यावर पुढे फाटाफूट आणि वाताहत ठरलेली.

मनसे

राजकारण हि पूर्णवेळ करण्याची जिन्नस आहे , तीही गांभीर्याने करण्याची.राजकारण करताना सत्तेची अपेक्षा असेल तर आधी गावपातळीवर पक्षाची बांधणी असायला हवी आणि ती बांधणी पक्षाला मानणाऱ्या माणसांची असावी, मुळात आधी पक्षाची धोरण असावीत आणि त्या धोरणांना मानणारी माणस पक्षात असावीत.दुसऱ्या कुठल्या पक्षात स्थान नाही किंवा विरोधक सेनेत म्हणून मी मनसे मध्ये अस करून पक्षाची वाढ होत नाही.खाली हा मोठा खड्डा असल्याने लोक राज ठाकरेंची भाषण ऐकतात, त्यांनी सांगितलेलं लोकांना पटत पण त्याचवेळी उमेदवार म्हणून समोर उभी राहिलेली माणस लोकांना आश्वासक वाटत नाहीत , लोकांना मतदानाला घेऊन जाणारी यंत्रणा नाही अशा स्थितीत नुसत्या भाषणांच्या बळावर माध्यमात स्थान मिळेल पण आमदार नाही हाच मनसेला संदेश.

नव्या सरकारकडून असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अपेक्षांबद्दल लवकरच सविस्तरपणे एक तारखेनंतर लिहूया, तोवर भाजपला घालवल्याचा आनंद साजरा करायला हरकत नसावी, अर्थात या बाबीचाही भाजपने विचार करावा, आपल सरकार गेल्याचा लोक जल्लोष साजरा करतात यातच सगळ आल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*