Blog | विधानसभा निवडणूक ताळेबंद (भाग २)

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेच नाही. त्यातून नवी महाविकास आघाडी उदयाला आली. त्यावर निकालाचा ताळेबंद मांडला आहे आनंद शितोळे (अहमदनगर) यांनी.. वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस-भाजप दोन्ही पक्षांची धोरण काहीही असली तरी सत्ता त्यांच्यासाठी साधन आहे.भाजपला म्हणजेच संघाला हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी आणि कॉंग्रेसला भांडवलशाही राबवायला.भाजपची वाटचाल एक पाउल पुढची आहे धार्मिक अजेंडा आणि भांडवलशाही दोन्हींचं हित आणि संगम.आपल्यासाठी पर्याय फक्त दगड कि वीट एवढाच.
कॉंग्रेसची बदललेली धोरण जी १९४७ ला होती, जी १९७० पर्यंत होती ती उरलेली नाहीत हे वास्तव आहे. अशावेळी साहजिकच भांडवलशाहीचा पर्याय म्हणून आपण वर्गसंघर्षाची मांडणी करणाऱ्या पर्यायाकडे पाहतो.साम्यवादी तत्वज्ञान भारतीय समाजाच्या साठी कस मॉडेल तयार करायचं या गोंधळात अजूनही आहे.शेवटच्या माणसाच्या हितासाठी काम करण्याची तळमळ असलेला पर्याय अजूनही समोर नाहीये. असा पर्याय आपण देऊ शकतो किंवा आपण असा पर्याय देतोय अस म्हणून हि आघाडी पुढे आली.त्यांच्या जोडीला इतर काही पक्ष आणि प्रामुख्याने एमआयएम होता. एमआयएम चा पायाच मुळात धार्मिक राजकारणावर आधारलेला आहे अस असतानाही राज्यघटनेच्या तत्वांशी प्रामाणिक राहून राजकारण या समान मुद्द्यावर हे एकत्र आले.लोकसभेला त्यांची ताकद आणि उपद्रवमूल्य सगळ्यांना समजल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएम चे मतभेद झाले आणि ते बाहेर पडले मात्र राज्यात मुळातच मर्यादित असलेली ताकद असल्याने त्यांचा तितकासा प्रभाव पडू शकला नाही मात्र वंचित बहुजन आघाडीने याही निवडणुकीत आपली ताकद दाखवून उपद्रवमूल्य सिद्ध केल. सर्वसामान्य जनतेला या आघाडीकडून अपेक्षा आहेत म्हणूनच लोकांचा प्रतिसाद मिळतोय मात्र हा प्रतिसाद आणि स्वीकारार्हता मर्यादित आहे.हि वाढवायला काय करायला हवय हा कळीचा मुद्दा. इथे मनसेचा संदर्भ आणि अनुभव लक्षात घ्यायला हवा.
मनसेला लोकांनी दोन आकडी आमदार निवडून दिले, महापालिका सत्तेची संधी दिली.हि सुवर्णसंधी होती.आपापले आणि आसपासचे मतदारसंघ बांधून पुढल्या निवडणुकीत विस्तार करण्याची.मात्र विधानसभेत अनुत्पादक गोष्टीत आमदार गुंतले, निलंबन ओढवून घेतल आणि पुढे सगळाच पोरखेळ झाला.पर्यायाने लोकांचा भ्रमनिरास झाला.सतत बदलत्या भूमिका, स्पष्ट राजकीय धोरणांचा अभाव आणि धरसोड यांचा परिणाम वाईट झाला.राज ठाकरेंच्या सभांना लोकसभा –विधानसभा निवडणुकीत प्रतिसाद मिळाला मात्र त्याच रुपांतर मतांत होऊ शकल नाही. हि संधी वंचित बहुजन आघाडीला मिळवायला काय करायला हवय ?
२०२४ ची लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आताच कामाला लागायला हवय. १०० नगरसेवक, १०० पंचायत समिती सदस्य आणि ५० जिल्हा परिषद सदस्य हे किमान टार्गेट समोर ठेवून या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात समविचारी पक्षांशी युती करून निवडणुका जिंकून आपला राजकीय जनाधार निर्माण करायचा.कुणाला पाडण्यापेक्षा आपला उमेदवार निवडून आणणे महत्वाचे.
आपला विरोधक अमक्या पक्षात आहे म्हणून दुसऱ्या पक्षात उडी मारणारे आयाराम कधीही गयाराम होऊ शकतात,तळातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे हेच सूत्र महत्वाच.
या निवडून आलेल्या लोकांची कामगिरी पक्षाने दर सहा महिन्यांनी तपासून सूचना करून सुधारणा करायची, कामाचा लेखाजोखा लोकांसमोर मांडत राहायचा.जोडीला लोकांच्या प्रश्नाचा अभ्यास करून आंदोलन उभी करून सतत लोकांच्या संपर्कात राहायचं. या कामाच्या बळावर मग लोकसभेला आणि विधानसभेला समविचारी पक्षाशी युती करून किमान ५ खासदार आणि २५ आमदार निवडून आणायची क्षमता निर्माण झाली तर मग हे आमदार आपल काम लोकांच्या पुढे ठेवू शकतील आणि मग २०२९ च्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने काही भविष्य असू शकेल.
सामुहिक नेतृत्व नसलेल्या , एकखांबी तंबू असलेल्या पक्षांना व्यापक जनाधार मिळवायला अडचण येते कारण स्थानिक पातळीवर,जमिनीवर स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर मग लोकांमध्ये विश्वास निर्माण होत नाही. आम्ही पर्याय देतोय अस म्हणून लोक संधी सहजासहजी देत नाहीत.लोकांनी अनुभव घेऊन पक्षांना जोखलेल आहे.मनसेला दिलेल्या संधीच उदाहरण देण्याच कारणही तेच आहे.
केंद्रीय पातळीवर भावनिक,अस्मितांच राजकारण केल जात असेल तरी स्थानिक , राज्य पातळीवर मात्र लोकांना काम करणारी माणसच पाहिजे असतात. वंचित बहुजन आघाडीबाबत बरच उलटसुलट बोलल जात , सोशल मिडीयावर होणारे वाद, लढाया याही डोळ्यासमोर आहेत.आरोप-प्रत्यारोप हेही चालूच राहणार आहेत.मात्र सत्तेच्या मोठ्या परिघात जर कामगिरी बजवावी अस वाटत असेल तर या दीर्घकालीन प्रयत्नांना आणि योजनेला पर्याय नाही.अन्यथा आपला उपयोग कुणाला तरी पाडायला होणे आणि सत्तेपासून वंचित ठेवणे एवढाच होणार असेल तर मग आपण फक्त वापरलेच जाणार का आणि कुणाची तरी बी-टीम म्हणून आरोप झेलणार का खरा प्रश्न. या आघाडीकडूनच जात-धर्मविरहित तळागाळातल्या माणसांना काही अपेक्षा आहेत.शोषित आणि शोषक याच जाती अस्तित्वात असलेल्या समाजात शोषक आपल्या जातीचा आहे म्हणून कुणी त्याने केलेला अन्याय गोड मानून सहन करत नाही किंवा त्या अन्यायाला अन्याय म्हणायला कचरत नाही हे वास्तव आहे.अशावेळी राज्यघटनेनुसार कामकाज करू पाहणारा हा पर्याय खरोखर तसा आहे आणि ते कृतीतून दिसत आहे हे लोकांना लक्षात आल तर लोकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळून या पर्यायाला बळ नक्कीच मिळू शकेल. तळटीप :- वंचित समर्थक आणि त्यांना बी टीम म्हणणारे विरोधक यांचा कलगीतुरा आणि चिखलफेक मी भरपूर पाहिलेली आहे.त्याबद्दल कॉमेंट क्षमस्व. माझा मुद्दा कॉंग्रेस-भाजप व्यतिरिक्त तिसरा सक्षम राजकीय पर्याय काय आहे हा आहे.सबब उणीदुणी आपापल्या भिंतीवर धुवून टांगावी.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*