कोकमठाण येथे क्रीडा स्‍पर्धा व विज्ञान प्रदर्शन

अहमदनगर :

आदिवासी विकास नाशिक विभागीय  शासकीय / निमशासकीय आश्रमशाळाचे दिनांक 7 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत ओम गुरुदेव जंगली महाराज आश्रम कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील आत्‍मा मलिक इंटरनॅशनल  स्‍कूलच्‍या  क्रीडा मैदानात तीन दिवसीय  क्रीडा स्‍पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

या क्रीडा स्‍पर्धामध्‍ये सांघिक खेळात हॅन्‍डबॉल,  व्‍हॉलीबॉल, कबड्डी , खो-खो, रिले तसेच  वैयक्तिक प्रकारात धावणे, चालणे, लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक इत्‍यादी प्रकारच्‍या मैदानी स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहेत. या स्‍पर्धेमध्‍ये नाशिक विभागातील राजूर प्रकल्‍पातील 351, नाशिक 404, धुळे 420, नंदूरबार 410, तळोदा 378, कळवण 414  व यावल 408 असे एकूण सात प्रकल्‍पातील 2 हजार 785  खेळाडू सहभागी होणार आहेत. सर्व उपस्थित विद्यार्थी, क्रीडा व्‍यवस्‍थापक व अधिकारी यांची  निवास, भोजनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्‍यांच्‍या संकल्‍पनेतून तयार केलेल्‍या वैज्ञानिक उपकरणाची माहिती व वैज्ञानिक दृष्‍टीकोन वृध्दिंगत व्‍हावा तसेच निरीक्षण शक्‍ती वाढीस लागावी यासाठी स्‍वच्‍छता व आरोग्‍य, शाश्‍वत कृषी पध्‍दती, भविष्‍यकालीन परिवहन व संचार, औद्योगिक विकास, खगोलशास्‍त्रीय तंज्ञज्ञान व शैक्षणिक खेळ व प्रतिकृती  या विषयांवर विज्ञान प्रदर्शनाचे  आयोजित करण्‍यात आलेले आहे.  इ. 5 ते 8 वी पर्यत लहान गट व इयत्‍ता 9 ते 12 पर्यत मोठा गट असे दोन गट करण्‍यात आले आहेत.

आदिवासी समाजाची संस्‍कृती टिकवूण रहावी व त्‍याची ओळख व्‍हावी त्‍यासाठी कागदापासून तयार केलेल्‍या वस्‍तू  कास्‍ट शिल्‍प, आदिवासी संस्‍कृती च्‍या कलाकुसरी यांचा प्रदर्शनामध्‍ये समावेश करण्‍यात आलेला आहे. या स्‍पर्धेमध्‍ये सहभागी होणा-या खेळाडू विद्यार्थी व बाल वैज्ञानिक यांना चषक व विविध पदके देऊन गौरविण्‍यात येणार आहे. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प विभागाचे  प्रकल्‍प अधिकारी संतोष ठुबे यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*