फडणवीस व विखेंनी वंचित ठेवल्याचा आरोप

अहमदनगर :

महाराष्ट्रातील घरकुल वंचितांना निवार्‍याचा मुलभूत अधिकार मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने राज्याचे नुतन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारपुढे प्रश्‍न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतीच हुतात्मा स्मारक येथे घरकुल वंचितांची बैठक पार पडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता व राधाकृष्ण विखे पाटील यांनी घरकुल वंचितांची अवहेलना करुन त्यांना सामाजिक न्यायापासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला.

 महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बैठकीला प्रारंभ करण्यात आले. तसेच यावेळी भारताचे माजी निवडणुक आयुक्त टी.एन. शेषन व माजी खासदार दादा पाटील शेळके यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, अंबिका जाधव, जालिंदर बोरुडे, लिला रासने, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, किशोर मुळे, लतिका पाडळे, संगिता साळुंखे, नजमा शेख, हिराबाई ग्यानप्पा, शबाना शेख, अंबिका नागुल, आशा जोमदे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भाजप सरकारने घरकुल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेचे स्वप्न दाखविले. मात्र महाराष्ट्रात कोणताही मोठा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला नाही. इतर राष्ट्रांमध्ये लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना कार्यान्वीत करुन घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील भाजप सरकारने कोणताही पुढाकार न घेता 5 वर्षे वाया घालवली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यातही धुळफेक केली आहे. राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारकडून मोठ्या अपेक्षा असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली. तर अशोक सब्बन यांनी शासन प्रशासनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी संपल्याशिवाय घरकुल वंचितांना न्याय मिळणार नाही. नव्या सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. भारतरत्न मिळणे हा देशातील सर्वोच्च सन्मान असून, मात्र सध्या भारतरत्न देण्यावरुन राजकारण केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेद्वारे अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरांमध्ये घरकुल वंचितांना पाचशे स्के.फुटचे घर 5 ते 6 लाखा पर्यंन्त मिळणे शक्य आहे. आज या घराचे बाजारभाव 10 ते 12 लाख रुपये आहे. या योजनेमुळे निम्म्या किंमतीत लाभार्थींना घरे उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय 2 लाख 67 हजार रुपये अनुदान मिळणार असल्याने ही घरे सहज साकार होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*