Blog | तर हातची वेळही गेलेली असेल..!

ब्रिटनचा भावी राजा असलेले प्रिन्स चार्ल्स म्हणाले की, “पृथ्वीवरील जीवन वाचवण्यासाठी फक्त दहा वर्षांचा अवधी हातात आहे.” तापमानवाढीमुळे अंटार्क्टिकावरील व इतर बर्फ वितळल्याने सागराची पातळी वाढत आहे. प्रशांत महासागरात बुडून लुप्त होत असलेल्या देशांपैकी ‘साॅलोमन’ बेट – देशाला चार्ल्स भेट देत आहेत.

चार्ल्स म्हटले की मुंबईचे डबेवाले डोळ्यासमोर येतात. ते डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे भरभरून कौतुक करतात. पण हे लक्षात घेत नाहीत की, मावळच्या हजारो वर्षे स्वयंभू जीवन जगणाऱ्या या मूळच्या शेतकऱ्यांना शंभर वर्षांपूर्वी, मूळशी धरणामुळे (सन १९२३) उध्वस्त व्हावे लागले व याला कारण चार्ल्स यांच्या ब्रिटीश पूर्वजांनी केलेले औद्योगिकरण व शहरीकरण आहे. मुंबईच्या कापड गिरण्या व इतर उद्योगांना वीज पुरवण्यासाठी मूळशीच्या शेतकऱ्यांनी त्याग करायला हवा कारण त्या नोकरी देतात”, असा टाटांच्या धरणाचा युक्तिवाद होता.* भारतीय उपखंडाला उध्वस्त करणारा हा युक्तिवाद आजही नाणार, जैतापूर, वाढवण, ‘दिल्ली मुंबई काॅरिडाॅर’ इ. प्रकल्पांकडून चालूच आहे.

युवराजांच्या पृथ्वीबाबतच्या काळजीच्या संदर्भात याला फार महत्व आहे, कारण हाच आजच्या सर्वविनाशक तापमानवाढीकडे झालेला प्रवास आहे. या युवराजांच्या हे लक्षात येतेय का?
निदान शंभर वर्षांपूर्वी चरखा चालवून मँचेस्टरच्या ऊर्जाग्राही स्वयंचलित यंत्रांना यशस्वीरित्या तोंड देणाऱ्या आपल्या पूर्वजांचा विसर आपल्याला तरी पडू नये.

चार्ल्स’ म्हणतात की, “मार्ग बदलला पाहिजे”. म्हणजे काय करणार? आज कार्बन उत्सर्जन शून्य करण्याची गरज आहे. ते औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था चालू ठेवून तर होणार नाही, आणि चार्ल्स, ते बंद करा असे म्हणत नाहीत. ही मानसिक कोंडी आहे. आपल्याच सापळ्यात स्वतःला आधुनिक म्हणवणारी मानवजात अडकली आहे. सत्य स्वीकारले तर वाचू. पण पृथ्वीबाबतचे सत्य स्वीकारायचे, तर स्वयंचलित यंत्र, वीज व इतर ऊर्जा, सीमेंट- स्टील इ. वापरणारे औद्योगिक युग तात्काळ थांबवावे लागेल.

केवळ मावळच्या शेतकऱ्यांनीच विरोध केला नव्हता, तर जगभर शेतकरी, आदिवासी, मच्छीमारांनी यंत्राविरूध्द उठाव केले होते. औद्योगिकरण करणाऱ्या व नवी अर्थव्यवस्था आणणाऱ्या माणसांसह सर्व मानवजात दहा बारा हजार वर्षांपूर्वी जंगलातच रहात होती. ठिकठिकाणी, त्यातील काही माणसे शेतीत आली व फक्त २५० वर्षांत वेगवेगळ्या भागांत माणसे औद्योगिकरणात सामील झाली. उत्क्रांतीच्या लाखो- करोडो वर्षांच्या पार्श्वभूमीवर हा कालखंड नगण्य आहे.

युरोपातील शेतकरी व आदिवासींनी यंत्राविरुद्ध दोन- अडिचशे वर्षांपूर्वी उठाव केले. ते राजसत्तेने व तेव्हाच्या नव्या ‘तंत्र- अर्थ’ सरंजामदारांनी विज्ञानाचे नाव घेत मोडले. पृथ्वीवर त्या त्या भागात यंत्र येण्यापूर्वी आताप्रमाणे, ‘रोजगार’ व अर्थातच ‘बेकारी’ ही संकल्पना नव्हती.

ब्रिटिशांनी भारतातील ग्रामीण व्यवस्थेचा (उदा. तामिळनाडूतील चेंगलापट्टू जिल्हा) केलेला अभ्यास उपलब्ध आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री धरमपाल यांनी इंग्लंडला जाऊन ब्रिटीश सरकारने सुरक्षित व गुप्त ठेवलेल्या अधिकृत ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला. ब्रिटनप्रणित यंत्रोद्योग व अर्थव्यवस्था येण्याआधी भारतात हजारो वर्षे स्वयंपूर्ण व सार्वभौम ग्रामीण रचना होती. या गावांच्या स्वावलंबनामुळे राज्यकर्त्यांवर त्यांचे अवलंबित्व नसल्यासारखे होते. ही रचना यंत्र, ऊर्जा व चलनावर आधारित ब्रिटीश आक्रमणाने योजनापूर्वक तोडली. पृथ्वीशी जोडलेला, अन्न पिकवणारा स्वयंपूर्ण शेतकरी मावळप्रमाणे भारतात सर्वत्र हजारो वर्षे होता. तो किंवा शेतमजूरही आताच्या अर्थाने रोजगार करत नव्हते. अन्ननिर्मितीसह पृथ्वीच्या सर्वच सृजनाच्या विरूद्ध काम करणाऱ्या औद्योगिक मुंबईला, डबे पोचवण्याचे काम आज मावळचा शेतकरी करतो.देशातील इतरही शेतकरी या शोषक मुंबईचे पोषण करतात. हीच गोष्ट इतर देशांची त्या त्या शहरांच्या संदर्भात आहे.

एक इंग्लंडमधील सुवर्णपदकविजेता रासायनिक शेतीतज्ञ डाॅ. अल्बर्ट हाॅवर्ड सन १८९५ मधे भारतीयांना रासायनिक शेती शिकवण्यासाठी सरकारतर्फे भारतात पाठवला जातो. दुसरा वास्तुशिल्पशास्त्रातील सुवर्णपदकविजेता लाॅरी बेकर १९४२ च्या आंदोलनात भारत समजुन घेण्यासाठी गांधीजींबरोबर राहतो. नंतर हे दोघेही त्या क्षेत्रांत भारताला गुरू मानतात. ‘हाॅवर्ड’ यांनी रसायने सोडली व बेकरांनी सीमेंट स्टीलच्या बांधकामांचा त्याग करून मातीची कास धरली. भारतीय चरखा व हातमाग तर हजारो वर्षे भारत व जगाची, वस्त्राची गरज, कोणताही विनाश न घडवता व्यवस्थित भागवत होते. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा कृषियुगातील भारतीय मार्ग शाश्वत असू शकत होता. परंतु दुर्दैवाने भारत स्वतंत्र झाल्यावर औद्योगिकरण स्वीकारले गेले व हवामान बदल व तापमानवाढीच्या प्रवासात भारतही हातभार लावू लागला.

स्पेनची राजधानी ‘माद्रीद’ या शहरात २ डिसेंबर म्हणजे परवापासुन संयुक्त राष्ट्रसंघाची अत्यंत महत्त्वाची ‘पर्यावरण व हवामान परिषद’ सुरू झाली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याऐवजी त्यात सध्या मोठी वाढ होत आहे. या चिंताजनक परिस्थितीवर या परिषदेत विचार होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी युरोपियन संसदेने, पूर्ण पृथ्वी ग्रहावर जीवनरक्षणाच्या दृष्टीने आणिबाणी जाहीर करणारा ठराव मंजूर केला. युरोपमधील देशांनी सन २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य करावे असे आवाहन त्यात केले. पण अशाने काही होणार नाही, कारण विज्ञान म्हणते की, ‘या क्षणापासुन उत्सर्जन शून्य होण्याची गरज आहे नाहीतर सन २०५० ला मानवजातच नसेल’. याआधी मँचेस्टर व लंडन या जगात स्वयंचलित यंत्राची म्हणजे तापमानवाढीची नांदी करणाऱ्या शहरांनी व इंग्लंड आणि स्काॅटलंड या देशांनी पर्यावरण आणिबाणी जाहीर केली आहे. परंतु काय, त्या देशांनी व शहरांनी मोटार व इतर वाहनांचे कारखाने बंद केले किंवा उत्पादन कमी केले? काय कोळसा जाळून होणारी वीजनिर्मिती बंद केली वा खाणी बंद केल्या? काय सीमेंट स्टीलचे कारखाने बंद केले? नाही ना! मग चार्ल्स यांच्या काळजीला आणि युरोपीय संसदेच्या शाब्दिक चिंता वाटण्याला काहीही अर्थ नाही.

आता जगाला, केवळ उपभोगवादावर आधारलेली अर्थव्यवस्था फक्त सोडून भागणार नाही तर, नैसर्गिक उपभोगाची पृथ्वीची चौकट थोडीही मोडून चालणार नाही. वातावरणातील असलेला कार्बन कमी होणे व हरितद्रव्याचा थोडाही नाश होऊ न देणे, ही मानवजात वाचवण्यासाठीची अट तरच पाळली जाईल.

सन २०५० पर्यंत वीज घराघरात असणे, सर्वांना एसी देणे, सर्वांनी सीमेंटच्या घरात राहणे, व दारात मोटार असणे, उद्या खनिज इंधन संपेल म्हणून ऊसाचा रस व साखर, इथेनॉल – बायोडिझेलसाठी उपलब्ध करणे,’ अशा कल्पना बाळगणे हे फक्त पृथ्वीवरील वास्तवापासुन दूर स्वप्नांच्या दुनियेत राहणे आहे. झोपेत स्वप्न पाहणाराला ते सर्व स्वप्नातील जग खरेच वाटत असते. मात्र जाग आल्यावर त्याला त्यातील असत्याची जाणीव होते. असे आताच्या मानवजातीबाबत घडत आहे. जीवनशैलीच्या निद्रेतून तो तात्काळ जागा होईल आणि औद्योगिक – आर्थिक स्वप्न मोडेल व कृषियुगात परत जाईल तरच मानवजात वाचू शकेल.

अॅड. गिरीश राऊत, निमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ, मो. ९८६९०२३१२७

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*