Blog | आणि साहेबांकडे पाहण्याची दृष्टीच बदलली…

दिल्लीतून महाराष्ट्राकडे पहिले की फक्त एकाच नेत्याची राज्यव्यापी व्याप्ती डोळ्यात ठसते, तो नेता म्हणजे शरद पवार. माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री, माजी कृषिमंत्री, काँग्रेस पक्षाचे माजी नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आणि सर्वेसर्वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरु, कला व संस्कृतीचे रसिक, क्रिकेट खेळाचे संघटक, शेतीचे अभ्यासक, सहकारामधील महर्षी आणि बरेच काही…

शरद पवार यांची नेमकी ओळख काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. साहेबांच्या मनाचा थांगही अनेकांना लागला नाही तर त्यांची नेमकी ओळख मी कशी सांगू शकणार? पण एक गोष्ट मात्र पक्की आहे. ती म्हणजे पवार साहेब हे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नरत असलेले महान नेते आहेत. म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चार कौतुकाचे शब्द लिहावेसे वाटतात.

लहानपणी देवभोळा धर्मवादी असलेला मी कॉलेजमध्ये आल्यावर मात्र, परिस्थितीच्या झटक्यांनी एकदम बदललो. पहिल्यांदा मतदान करताना भाजप हाच पर्याय असल्याचे वाटत होते. दरम्यान माझा अबोलपण सोडून मी बोलकाही झालो. मात्र, याच काळात विचारांनी डावा बनल्याने व्यवस्था आणि प्रस्थापित यांना शिव्याही घालत होतो. आधी उजव्या बाजूने पाहताना भाजप म्हणजे देशाचा विचार असे समजणारा मी आता डाव्या बाजूने सगळ्यांकडे पाहत होतो. शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर हेच कम्युनिस्ट म्हणा किंवा समाजवादी विचार ‘स’ सोडून माजवादात बदलले. त्यावेळी पवार साहेब, काँग्रेस, काँग्रेसी विचार यांच्याकडेही डाव्या बाजूने पाहताना फालतूचे ज्ञान पाजळले. पत्रकारितेतही आपणच श्रीकृष्ण असल्याचा आव आणून समाजाच्या अन्यायाला वाचा फोडत बसलो.

पण दुसऱ्यांच्या मर्यादा शोधण्याच्या नादात आपलाच व्याप विस्तारण्याचा राहून जातो, अशा शब्दांत मित्राने डावेपणाची झूल उतरायला भाग पडले. दरम्यानच्या काळात देशासह राज्यातही सत्तांतर झाले. नरेंद्र मोदी गुजरातेतून थेट दिल्लीला आले. विचारांचा समाजवादी दृष्टिकोन व स्व. शरद जोशी यांच्या विचारांतील काही भाग लक्षात घेऊन शेतीच्या उन्नतीसाठीचे माझे प्रयत्न मी सुरू केले. मोदींच्या विकासाचा फोलपणा पत्रकारितेने समजून सांगितला होताच. पण डाव्या बाजूने सगळीकडे पाहताना काँग्रेस असोत की पवार साहेब, सगळ्यांना बोल लावून हेच व्यवस्थेची वाट लावणारे असल्याची मांडणी करीत होतो.

मात्र, देशातील सत्तेबरोबरच माझा व्यवस्था व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मध्यममार्गी बनला. आधी उजवीकडून सुरु झालेला प्रवास डावेपणाकडे झुकला आणि आता मात्र, मध्यममार्गी विचार हेच समाजाची व देशाची गरज असल्याचे पटले आहे. मध्यममार्गी म्हणजे मध्यमवर्गीय कोते विचार नाही हं. कारण, मध्यवर्गीय विचार हा आपमतलबी असतो. घरात बसून समाजाच्या सेवेच्या बाता नसतात करायच्या. त्यासाठी कृती करावी लागते. त्यासाठी विचार असायला पाहिजे.

असा कृतियुक्त विचार म्हणजे शरद पवार. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेकांनी आपापल्या काळात सामाजिक उन्नतीचे कार्य केले. काहींना यात यश आले तर काहींना अपयश. मात्र, हेतू चांगला असलेल्या याच मंडळींनी महाराष्ट्र आणि आपला भारत देश घडविला आहे. धर्म व जात याच्या पलीकडे जाऊन त्या नेत्यांनी समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. असेच सध्याचे नेतृत्व म्हणजे पवार साहेब.

काँग्रेस, देशाची समाजवादी व्यवस्था, सर्वधर्मसमभावाचा विचार, धर्मनिरपेक्षता आणि पवार साहेबांना बोल लावीत विकासाची फळे चाखणारे सध्या बहुसंख्य भेटतात. भारताच्या उन्नतीसाठी कोणीतरी श्रीकृष्ण येईल अशाच थाटात बाता मारतात. सल्लेही जोमाने देतात. स्वप्नरंजन करून विकासाच्या गप्पाही मारतात. मात्र, त्याचवेळी शेती आणि शेतकरी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला हातभार लावण्याचे काम पवार साहेब करीत असतात. पक्षभेद विसरून ते हे काम करतात. त्याचा कुठेही उगीच बडेजाव मिरवण्याची गरज त्यांना वाटली नाही.

डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने मी पवार साहेबांकडे पाहिलेले आहे. एकदाही न भेटता त्यांना बोल लावण्याचा बोलघेवडेपणाही केला आहे. आता मला स्वतःचेच त्याबद्दल कौतुक वाटते. माहिती व ज्ञान आणि विचार व समज यामधील सीमारेषा समजण्याची गरज आहे. मगच पवार साहेबांच्या कामाची उंची समजू शकते. सर्वांच्या भावनांना कोणीही गोंजारु शकत नाही. पण महिला व वंचित घटकांसाठी काम करताना सक्षम जाती व धर्म यांची पर्वा न करता काम करणे म्हणजेच देशाच्या विकासासाठी काम करणे. हाच विचार घेऊन पवार साहेब कार्यमग्न आहेत आणि यापुढेही राहतील.

शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांनी एकदा पवार साहेबांची साथ दिली होती. पण नंतर दोघेही वेगळे झाले. याचे कारण त्या दोघानांच माहित. मात्र, आताही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी हे पवार साहेबांकडे आकर्षित झाले आहेत. ते राजकीय अपरिहार्यतेपोटी आकर्षित झाले की साहेबांचे कार्य समजल्याने हे माहित नाही. पण हा बदलही महाराष्ट्राला नक्की पुढे घेऊन जाणारा असेल. फक्त बोलून सामाजिक उन्नती होणार नाही. त्यासाठी झपाटलेपणाने काम करावे लागेल. विषयाची समज घेऊन उत्तरे शोधावी लागतील. अशी उत्तरेही समाजाला पचनी पडणारी व सकारात्मक दिशा देणारी असायला पाहिजेत. मलाही पवार साहेब अशी दिशा दाखविणारे मार्गदर्शक वाटतात.

डाव्या किंवा उजव्या बाजूने नाही, तर नॉर्मल दृष्टिकोनातून पाहिल्याशिवाय पवार साहेबांचे काम नाही दिसू शकत. त्यासाठी मात्र, वेळ यावी लागते. या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे सर्वेसर्वा अमित शाह व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या (अव)कृपेने ही वेळ माझ्यासाठी आली. तुम्हालाही वेळ आल्यावर समजेल या विचारी नेत्याची महती…

साहेब, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

लेखक : सचिन मोहन चोभे,
मो. ९४२२४६२००३

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*