जनसामान्यांना आपलंसं करणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे..!

भारतीय जनता पार्टीच्या बांधणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा गोपीनाथराव मुंडे यांची 12 डिसेंबर ही जयंती. यानिमित्त गोपीनाथरावांबरोबर 1980 च्या दशकात पक्षाचे काम केलेल्या शैला पतंगे-सामंत यांनी गोपीनाथरावांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

येणार्‍या प्रत्येकाशी किमान एक वाक्य तरी बोलले पाहिजे, बर्‍यापैकी ओळख असलेल्याशी दोन चार वाक्याची देवाणघेवाण झाली पाहिजे. असा मुंडे साहेबांचा स्वभाव होता. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अशी पदे भूषविणारे गोपीनाथराव म्हणूनच लोकनेते झाले. मुंडे साहेबांचा संपूर्ण राजकीय प्रवास संघर्ष आणि कष्टाने भरला होता. आपल्या कार्यशैलीमुळे सगळ्यांना साथीला घेत गोपीनाथरावांनी पक्ष वाढविण्याचे काम 1980 ते 1990 या दशकात केले. या दशकात पक्ष वाढवणे हे शिवधनुष्य पेल्यान्यापेक्षाही अवघड काम होते. पक्षाची स्थापना 1980 मध्ये झाली. जनता पक्षातून बाहेर पडल्यामुळे नव्याने सुरुवात करायची होती. 1986 मध्ये पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी गोपीनाथारावांवर सोपविली गेली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे 35. उच्चवर्णीयांचा पक्ष असा शिक्का बसलेल्या भाजपला ग्रामीण भागात आणि बहुजन समाजात पोहचविण्यासाठी गोपीनाथरावांनी अफाट परिश्रम घेतले. प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची एकनिष्ट कार्यकर्त्यांची गोपीनाथरावांनी नेहमीच कदर केली. समोर कार्यकर्ता दिसला आणि गोपीनाथरावांनी त्याची विचारपूस केली नाही, असे कधीच घडले नाही. 1980 ते 1990 ही 10 वर्षे पक्षाच्या उभारणीच्या दृष्टिने अत्यंत खडतर होती. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून गोपीनाथरावांनी राज्यातल्या वाड्या, वस्त्या, गांवे पिंजून काढली. कार्यकर्त्याच्या घरात सतरंजीवरही झोपणारे गोपीनाथराव अनेकांनी पाहिले आहे. वसंतराव भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथराव,  धरमचंद चोरडिया, शरद कुलकर्णी, वसंतराव पटवर्धन, विश्वास गांगुर्डे आदींनी घेतलेल्या कष्टामुळे पक्ष त्या काळात जनसामान्यांमध्ये रुजू शकला.
कार्यकर्त्यांच्या मनावर जादू करण्याची आणि प्रेम टिकवून ठेवण्याची किमया अगदी मोजक्या नेत्यांकडे असे, त्यापैकी एक म्हणजे गोपीनाथराव. जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला आणि आभाळाची सावली देणारा नेता असं त्याचं वर्णन करता येईल. युतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना गृह तसेच ऊर्जा मंत्री अशी महत्वाची खाती त्यांच्याकडे होती. गिरगावसारख्या मध्य वस्तीतील भागात वेश्या व्यवसाय अव्याहतपणे चालू होता. वेश्या व्यवसाय हा अपघातातून करावा लागतो पण सामान्य जीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सदर व्यवसाय मध्यमवर्गीयांच्या वस्तीतून हलविणे गरजेचं होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्रीपद सांभाळणार्‍या गोपीनाथरावांकडे तशी मागणी केल्यावर गोपीनाथरावांनी कार्यकर्त्यांची ही मागणी तातडीने मान्य केली. राज्यभरातल्या कार्यकर्त्यांकडे गोपीनाथरावांच्या अशा अनंत आठवणींचा खजिनाच आहे. लोकशाही स्वातंत्र्याची आस असणार्‍या समाजातील सोशित, वंचित पीडित सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी प्रसंगी प्रवाहाच्या विरोधात जाणारा नेता म्हणजे गोपिनाथराव मुंडे.  
बीड जिल्ह्यातील नाथरा (परळीपासून 12-13 किलोमीटर) या गावात 12 डिसेंबर 1949 रोजी गोपीनाथरावांचा जन्म झाला. त्यांचे 8 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण परळी येथे झाले. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. तेथे त्यांच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली. 1978 च्या विधानसभेसाठी गोपीनाथरावांना जनता पार्टीकडून रेणापूर मतदार संघातून उमेदवारी मिळाली. त्यावेळी त्यांच्या विरुद्ध झालेल्या जातीवाचक प्रचारामुळे गोपीनाथरावांना त्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले तरीही गोपीनाथरावांनी आपली जिद्द कायम ठेवली. पुढे 1980 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत जिंकली आणि राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. 1985 च्या निवडणुकीत गोपीनाथरावांना पुन्हा पराभूत व्हावे लागले. त्यांच्या कामाचा आवाका, शेतकरी, कामगारांचे प्रश्‍न मांडण्याची हातोटी ग्रामीण आणि शहरी भागाच्या प्रश्‍नांची जाण त्या प्रश्‍नासाठी झोकून देऊन प्रश्‍नांची तड लावण्याची कला सत्ताधार्‍यांना कोंडित पकडण्याचे सामर्थ्य असे कर्तृत्व गुण असल्यामुळे वयाच्या 35 व्या वर्षी त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. 1986 ते 1995 हा गोपीनाथरावांचा प्रवास ज्यांनी पाहिला आहे ते भाग्यवानच म्हणावे लागतील. या काळात पक्ष बांधणीबरोबरच राज्यातील सत्ताधार्‍यांवर कठोर प्रहार करत गोपीनाथरावांनी सत्ताधार्‍यांचे सिंहासन अक्षरश: गदागदा हलवले. त्यामुळे 1995 साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येऊ शकले. गोपीनाथरावांच्या राजकीय कारकिर्दीला खर्‍या अर्थाने आकार दिला तो स्व.वसंतराव भागवत यांनी. गोपीनाथरावांचे गुण नेमकेपणाने हेरत त्याचा उपयोग वसंतरावांनी पक्ष वाढीसाठी करून घेतला. वसंतराव भागवत हे भारतीय जनता पार्टी नाही तर संघ परिवार आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही संपूर्ण माहिती असणारे अनोखे व्यक्तीमत्व होते. नव्याने भारतीय जनता पार्टीत आलेल्यांनी व तरुण कार्यकर्त्यांनी भागवत माहीत करुन घेतले तर गोपीनाथरावांसारख्या कार्यकर्त्यांनी त्या काळात पक्ष कसा वाढवला या मागची कारणे कळू शकतील.
गोपीनाथरावांसारख्या अनेक कार्यकर्त्यांना घडविण्याचे काम भागवतांनी केले. गोपीनाथरावांनी वसंतरावांच्या परिश्रमाचे चीज केले. दुर्देवाने गोपीनाथराव उपमुख्यमंत्री झाले. तो क्षण पाहण्यास वसंतराव हयात नव्हते. 1999 साली विधानसभेच्या निवडणुका सहा महिने आधीच घेतल्या गेल्या. लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र व्हावी जनतेचा पैसा वाचावा हा हेतू. निकालाअंती युतीचे सरकार आले नाही. निराश न होता पक्ष संघटना  पुन्हा कामाला लागली. गोपीनाथरावांना पुन्हा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष केले गेले. 1999 ते  2014 या काळात पक्षाला राज्यातील सत्तेने थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र नाउमेद न होता गोपीनाथरावांनी पक्षाच्या वाढीसाठी निरंतर परिश्रम चालूच ठेवले. देशभरातील कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे 2014 मध्ये आपला पक्ष केंद्रात प्रथमच स्वबळावर बहुमत मिळवू शकला.  गोपीनाथरावांना पंतप्रधान मा. मोदीजींनी केंद्र सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री केले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 2 जून 2014 रोजी म्हणजे मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर अवघ्या 8 दिवसातच गोपीनाथरावांचे अपघाती निधन झाले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*