महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रालयाचे पाच राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली :

दिनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत उमेद अभियानाच्या कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत(मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री  नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

येथील पुसा परिसरातील सी. सुब्रमन्यम सभागृहात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा , अवरसचिव अलका उपाध्याय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्यावतीने देशभर राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय योगदान देणा-या राज्यांना व संस्थांना विविध श्रेणींमध्ये एकूण 266 पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.

मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत उल्लेखनीय कार्यासाठी अमरावती जिल्हा राज्यात प्रथम ठरला असून या जिल्हयाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवल, धारणी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपजिल्हाधिकारी मनिष गायकवाड आणि  जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी  माया वानखडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मनरेगाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे जिल्हयात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून जिल्हयात मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी यवतमाळ जिल्हयातील बिटरगावचे सरपंच प्रकाश पेंधे आणि नंदूरबार जिल्हयातील भादवड गावचे ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय सरपंच आणि ग्रामसेवकांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत(ग्रामीण) आर्थिक वर्ष 2016-17  आणि 2017-18 मध्ये शासनाने ठरवून दिलेले घरबांधणीचे उद्दिष्टय कमी वेळात  पूर्ण केले आहे.

सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री  नरेंद्र सिंह तोमर आणि  राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*