Blog | झोपाळू शेती म्हणजे फ़क़्त नफाच नफा..!

शेती हा कधीच तोट्यात येऊ शकत नाही.. होय बाबाहो, कारण हा व्यवसाय करण्यासाठी कष्ट करणारे जिगरबाज लागतचं नाहीत.. कष्टाळुंना कधी यश मिळतेय व्हयं..? म्हणूनच शेती हा फक्त बोलघेवड्यांचाच उद्योग बनला आहे.. त्यामुळेच कष्ट करणार्यांसाठी झोपाळू शेतीचा हा नवा पर्यायही खुला झालाय..!

लेखक (संशोधन, अभ्यास आणि संकल्पना) : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग (मो. ९४२२४६२००३)

जागतिकीकरणाच्या झपाट्यात आता शेतीमध्ये अमुलाग्र बदल झालेत की.. म्हणजे अगोदर शेती मातीत कसून पिकवी लागायची.. आता व्हर्च्युअली पद्धतीने मशागत करूनही शेती पिकते.. त्याला म्हणतात शेतीचा नवा पर्याय अर्थात झोपाळू शेती..!

त्याचे पॉइंट असे थोडक्यात सांगितलेत. पण कार्यशाळेला येऊन फी दिलीत आणि वरती गोमय तीर्थासह नारळ अर्पण केलेत तर या झोपाळू शेती तंत्राचे सर्व कंगोरेही आमची झोपाळू शेती संवर्धिनी संस्था (मु.पो. आयतोबावाडी, ता. फेसबुकनगर, जि. झिरो कामधामवाडी. पिन कोडं ००००००; मो. ४२० ३०२ ३०७)

कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या झोपाळू शेतीच्या पाईक शेतकऱ्यांसाठी थोडक्यातले पाॅइंटमधील मुद्दे पुढीलप्रमाणे : १. शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी खतं गरजेची नसतात. फक्त मीठ वापरलं तरी चालतं. मीठ नसेल तरीही हरकत नाही. कारण आपल्या लघवीत खारटपणा असतोच की.. हेच मीठ म्हणजेच सर्वोत्तम खत. म्हणजेच कमी खर्चात भरघोस उत्पादनवाढ…

२. मीठ म्हणजेच सर्वोत्तम किटकनाशकही. इतकचं काय ज्या शेतात मीठाचा वापर केलाय तिथे वरूणराजाही जादा मेहरबान असतो. तिथं जादा पाऊस पडतो म्हणजेच शेतकर्यांची चंगळचं चंगळं..!

३. झिरो बजेट शेती म्हणजेही १ रुपड़्याचा खर्च न करता भरघोस उत्पन्न.. त्यातही फ़क़्त एका गाईच्या जीवावर ३० एक्कर शेत फुलतयाच ना..! मग दुध पिऊन झोपा काढुनबी शेत एकदम झक्कास पिकल की नाही..?

४. बिनपाण्यानं केलेली चंपी भलेही त्रासदायक असो. पण बिनपाण्याची लिंबाची बाग म्हणजे एकाच एकरात लाखोंचा नफा. मग उन्हाळ्यात काय फ़क़्त लिंबू मला मारिला रे खेळायची सोय पक्की..!

५. बिनपाण्याची शेती म्हटल्यावर पाण्यासाठी विहिर-बोअरवेल घ्यायला नको. जलसंधारण कामांची झंझट नको की पाईललाईन न् टँकरनं पिकांना पाणी टाकायला नको. म्हणजेच खर्च फ़क़्त मायनस शुन्य..!

६. नैसर्गिक पद्धत म्हणजेच नांगरणी, कोळपणी, खुरपणी आदींसाठी दमडी खर्चच करायला नको. मग दीडदमडीचे ते व्यापारी आपले काय बरे वाटोळे करणार..?

७. पिकांना फक्त गोमुत्राचा डोस दिला की काम फत्ते. त्यासाठीही कष्ट नाही लागत. गायाच शेतात चरायला सोडल्या की एकदम कामच फत्ते की..!

८. किटकनाशकांसाठीही झाडपाल्यांचं औषध वापरावं. तसचं तो खर्च नसल्यानं फुकटातच मिळणार की हो एकरी लाखोंचं उत्पन्न. न् आजारांवरचा खर्चही मासिक यादीतून एकाच झटक्यात हद्दपार..! म्हणजे बिनखर्चाचा फ़क़्त नफा..!

९. पिकांसाठी फक्त गोमूत्र न् मीठ वापरलं की भरघोस उत्पन्न मिळणार म्हटल्यावर उरतो फक्त पिक काढणी न् विक्रीचा खर्च. त्यासाठी खर्च तरी का म्हणून करायचा..? त्यातच गाया सोडून दिल्यात आणि त्यांनी खाल्लेल्या पिकाचे मस्त दुधदुभते हाती आले की तूप थेट विकणार ३००० रुपये किलो आणि दुध तर थेट १०० रुपये लिटर.. मग उरतो सगळा फक्त नफाच नफा..!

१०. पिकाची पेरणी करायला नको की पूर्व न् आंतरमशागत नको. अशा पद्धतीनं फक्त जमिनीवर बिया फेकून दिल्या, मीठ न् गोमुत्राच्या खताचा डोस दिला, किड आल्यावर हेच दोन घटक फवारले की मिळणार ना भरघोस पैसा..

वरच्या दहा मुद्द्यांवर अलक्ष केंद्रित करा आणि आम्हालाही पैसे मोजयाचे यंत्र घेऊन बोलवा तुमच्या शेतावर..

हा, नाही म्हणायला यातही झाडपाला कुटण्याचं कष्ट आहेच. मात्र, त्यालाही काय किंमत म्हणा..? कारण शेतकर्यांनाच किंमत नाही, तिथं त्यांच्या कष्टाचं काय म्हणा….अशा पद्धतीने फक्त घरात झोपा काढून, गावभर सैराटपणे उनाडक्या करून, पत्ते कुटत बसून, प्रेमप्रकरणं करून, दारूत झिंग-झिंगाटूनही शेती लाखोंचा नफा देणारचं की..?

झिरो बजेटमंधी इतका पैसा म्हणजेच ‘झोपाळू शेती’…!

शेतकरी मित्रांन्नो, याचा जाम प्रचार करा. मला लेक्चरला बोलवा. मानधनही द्या… मग मी तुम्हाला याच्या ट्रीक्स सांगेल. नाममात्र शुल्कात प्रशिक्षण देईल. पुस्तक, सीड्या-डीव्हीड्याही विकेल. टीव्हीवर झळकेल. टीव्हीवाल्यांसह बांधावरून शेती करणारे ‘झोपाळू शेती’वाले माझे प्रचारक बनतील. काही भाट विरोधक करणार्यांवर केस करीत फिरतील. अशा पद्धतीनं मलाही कदाचित महाराष्ट्र किंवा भारताचा (अख्ख्या होल इंडियाचा) रत्न म्हणुन पुरस्कारही मिळेल.

मग हीच विकासाची किमया यशकथांच्या माध्यमातून जागतिक वृत्तसंस्था जगापुढे मांडतील. त्यास कोणीही विरोध केला की, तो नक्कीच रासायनिक कंपन्यांचा भाट असेल..! प्रश्न विचारल्यासही त्यांच्या तोंडावर आम्ही फोटो मारून त्याची ‘बिनपाण्यानं’ करू. मंग जागतिक स्तरावरचा नोबेल पुरस्कार आमच्या खिशात आल्यास नवल ते काय???

असा आहे माझा शेतकर्यांच्या सर्वांगिण विकासीचा मूलमंत्र. अर्थात… “झोपाळू शेती”. So Let’s Enjoy Zopalu Sheti..!

(“हे सगळं मी झोपेतचं लिहिलयं. त्यातनं कोणाच्याही भावना दुखावल्यास माझी गाढ झोपच जबाबदार असेल. कृपया, याबद्दल केस करून किंवा विरोधाचे प्रश्न विचारून कोणीही झोपमोड करू नये, ही विनंती”)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*