नववर्षाच्या स्वागतासाठीच्या पार्ट्यांवर विशेष लक्ष..!

मुंबई :

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दृष्टीने संपूर्ण डिसेंबर महिना हा अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा असतो. या कालावधीत नाताळ, नवीन वर्ष स्वागत यासारखे सण येतात. ते सर्व समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. या दरम्यान जनमानसाचा मद्य प्राशनाकडे ओढा जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे या काळात, अवैध मद्य विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक दक्षतेने काम करणार असून विनापरवाना वा भेसळयुक्त. ड्यूटी फ्री, डिफेन्स मद्याचा वापर सार्वजनिक वा समारंभाकरीता करण्यात येऊ नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क  आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.

 महाराष्ट्रात, सीमेलगतच्या राज्यांच्या (गोवा, दमण, दादरा, नगर हवेली, सिल्वासा ) तुलनेत मद्याचे दर जास्त असल्याने या राज्यातून उत्पादन शुल्क बुडीत मद्य, बनावट मद्य, ड्युटी फ्री मद्य, अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री, वाहतूक यांचादेखील मोठ्या प्रमाणावर अवैध व्यापार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लगतच्या काळात बनावट स्कॉच, मद्य निर्मिती, विक्री यांचे उघडकीस आणलेले गुन्हे यामुळे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर एक दिवसीय तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती मधून या बनावट स्कॉचचा, ड्युटी फ्री मद्याचा सर्रास वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनंदिन पार्टीचे ठिकाणी तपासणी

नाताळ व नववर्षाकरीता मोठ्या प्रमाणात तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती (वन डे लायसेन्स) वितरीत करण्यात येतात. याठिकाणी भेसळयुक्त मद्य, ड्युटी फ्री, डिफेन्सचे मद्यप्राशन वा विक्री होऊ नये करीता 9 तपासणी पथके स्थापन केलेली असून डिसेंबरअखेर दैनंदिन पार्टीचे ठिकाणी तपासणी होणार आहे. मुंबई शहरातील स्पोटर्स क्लब, पंचतारांकित हॉटेल्स, देशी – विदेशी वाईन शॉप यांना एक दिवसीय मद्यप्राशन परवाने वितरीत केलेले आहेत. गोवा, दमण येथून मुंबईत येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस, रेल्वे तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील कार्यवाही

            मुंबई शहर जिल्ह्यामध्ये या आर्थिक वर्षात दारुबंदी गुन्ह्याअंतर्गत 299 गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये 306 आरोपींना अटक करून 11 वाहने जप्त केलेली आहेत. यामध्ये अवैध हातभट्टी, वाहतूक, बनावट स्कॉच, ड्युटी फ्री, उच्च प्रतीचे मद्य, दमण, गोवा निर्मित मद्य, बिअर यांचा समावेश आहे. एकूण 52 लाख 24 हजार 212 रुपये चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार 67 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सादर केलेले आहेत. जिल्ह्यामध्ये प्रभावी नियंत्रणाकरीता अधीक्षक  सी. बी. राजपूत व 2 उप – अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली 2 भरारी पथके, 9 कार्यकारी निरीक्षक यांची पथके कार्यरत आहेत.

अवैध हातभट्टी मद्य, बनावट मद्य, डयूटी फ्री मद्य, डिफेन्स मद्य, तसेच, विनापरवाना मद्य पार्टीबाबत काही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस विभागास तात्काळ कळवावे. बनावट अथवा भेसळ केलेल्या मद्याचा अवैधरित्या वापर, प्राशन करणे यामुळे संबंधितांना कारवाईस सामोरे जावे लागेल. बनावट मद्यामुळे आर्थिक फसवणूक होण्याबरोबरच हे मद्य आरोग्याकरीता अपायकारक ठरू शकते,असा इशाराही उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*