कामगार संघटनांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

अहमदनगर :

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात आयटक संलग्न सर्व कामगार संघटना सहभागी होत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. बुरुडगाव रोड येथील भाकपच्या कार्यालयापासून काढण्यात आलेल्या मोर्चात आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, लालबावटा जनरल कामगार युनियन, घरेलू मोलकरीण व घरगडी संघटना, पतसंस्था कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पतसंस्था, अवतार मेहेरबाबा कामगार युनियन सहभागी झाल्या होत्या.

जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करीत केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध नोंदवून, कामगारांचे प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात आयटकचे नेते कॉ.अ‍ॅड.सुधीर टोकेकर, सुवर्णा थोरात, सुरेश पानसरे, योगेश गलांडे, आकाश दंडवते, सतीश पवार, किशोर कांबळे, विजय भोसले, सुनिल दळवी, संजय डमाळ, उत्तम कटारे, रविंद पवळ, धनराज गजरमल, सुनिल शिंदे, मारुती सावंत, रावसाहेब शेरकर, निर्मला खोडदे, अंबादास दौंड, संजय शेलार, शब्बीर शेख, किसन तरटे, दिपक परभणे, सुनिल देवकर, सचिन कांडेकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

आशा कर्मचार्‍यांना 2 हजार रुपये वाढ केल्याचे नोटीफिकेशन काढले असून, त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, स्वतंत्र नोटिफिकेशन काढून त्यांना 3 हजार 500 रु. पर्यंत वेतन देण्यात यावे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना 2018 मध्ये जाहीर झालेला किमान वेतन व त्यातील फरक रक्कम अदा करावी, पगारासाठी जाचक अट रद्द करावी, ऑनलाइन पगार नियमीत दरमहाचे करावे, आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकारने आशा कर्मचारींना दरमहा 10 हजार वेतन द्यावे, त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांना 18 ते ते 24 हजार एवढे किमान वेतन देण्यात यावे, आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, अवतार मेहेर बाबा ट्रस्ट मधील कर्मचार्‍यांना किमान वेतन 18 ते 24 हजार देण्याची मागणी आयटकच्या वतीने करण्यात आली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*