सोमवारी पेन्शनधारकांचे उपोषण

अहमदनगर :

जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन बाबतची प्रकरणे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून, ती तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने सोमवार दि. 20 जानेवारी रोजी अहमदनगर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. तर या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील हजारो सेवानिवृत्त कर्मचारी संघटना मंगळवार दि.21 जानेवारी रोजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कॉ.आनंदराव वायकर, बापूराव नागवडे, बी.जी. काटे, आप्पासाहेब शेळके, आत्माराम मोडळे, वसंत तोरडमल, विष्णुपंत टकले, शिवाजी औटी, टी.के. कांबळे, बलभिम कुबडे, जालिंदर चोभे, सुभाष पोखरकर, भाऊसाहेब इथापे, नारायण होन, शरद नेहे, गोरख बेळगे, विठ्ठल देवकर, खुशालसिंग परदेशी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन बाबतची प्रकरणे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. यामध्ये सुचवलेल्या त्रुटींबाबत कागदपत्राची पूर्तता करून देखील त्याची सोडून केली जात नाही. उलट प्रत्येक वेगवेगळ्या त्रुटी काढून पुढील महिन्यात तुमचे प्रकरण मार्गी लावण्याचे सांगून चालढकल करण्याचा प्रकार चालू आहे. साखर कामगार, राज्य परीवहन निवृत्त कर्मचारी, ईपीएस95 पेन्शन वेल्फेअर असोसिएशन यांची बरीच प्रकरणे प्रलंबित आहे. या उपोषणात 100 सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी होणार असून या उपोषणकर्त्यांना विविध सेवानिवृत्त कर्मचारी संघटना पाठिंबा देणार आहे. सेवानिवृत्तांना भगतसिंह कोशियारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, कम्युटेशन कपात थांबविणे, ज्यादा कपात केलेली रक्कम व्याजासह परत करणे, सीबीटी मिटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे पंधरा वर्षे झाल्यानंतर पेन्शन मधून कम्युटेशनची रक्कम कपात करू नये, 15 वर्षांपेक्षा जास्त कपात केलेली रक्कम व्याजासह पेन्शन धारकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या आरओसीच्या रकमा अदा करण्यात यावे, ज्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना वेटेज व त्यांचा फरक मिळालेला नाही त्यांना तातडीने फरक मिळावा तसेच इतर अनुषंगिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*