उद्योग धोरणासाठी आर्थिक गणना

मुंबई :

केंद्र शासनाद्वारे देशामध्ये 7 व्या आर्थिक गणनेचे काम सुरु असून या गणनेतून संकलित होणाऱ्या माहितीचा उपयोग उद्योग, प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरीता धोरण तयार करणे तसेच स्थानिक पातळीवर नियोजन करण्याकरीता होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक संस्था आदींनी आर्थिक गणनेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आज केले.

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.जोंधळे यांनी या उपक्रमाबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. जोंधळे म्हणाले, मुंबई शहरातील सर्व आर्थिक घटकांची मोजणी या  आर्थिक गणना मोहिमेत मार्च 2020 पर्यंत करण्यात येत आहे. या गणनेची माहिती संकलित करण्याचे काम केंद्र शासनाच्या CSC या संस्थेद्वारे पूर्ण केले जात आहे. आर्थिक गणनेअंतर्गत माहिती संकलनाचे काम  2008 च्या कायद्याअंतर्गत प्रत्येक घरोघरी तसेच व्यापारी प्रतिष्ठाने यांना प्रत्यक्ष भेट देवून यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आर्थिक गणनेचे माहिती संकलन ग्रामपंचायत तसेच शहरातील प्रभाग स्तरावर होणार असून या माहितीचा उपयोग उद्योग, प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरीता धोरण तयार करणे तसेच स्थानिक पातळीवर नियोजन करण्याकरीता होणार आहे. मात्र ही माहिती गोळा करण्याकरिता नेमलेल्या पर्यवेक्षकांना औद्योगिक वसाहतीमधील उद्योग घटक, हॉटेल व्यवसायीक, दुकानदार आणि निवासी वसाहतीमधील नागरिकांकडून माहिती गोळा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या आर्थिक गणनेबाबत नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता गणनेसाठी आलेल्या पर्यवेक्षकांना/प्रगणकांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

आर्थिक गणनासंदर्भातील 2008 या कायद्याअंतर्गत ही गणना पुर्ण करण्यात येणार असून कुटुंबाची, आस्थापनेची संपूर्ण माहिती प्रत्येक स्तरावर गोपनीय राहणार आहे. तसेच आर्थिक गणनेच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामांतर्गत कुटुंबाने किंवा आस्थापनाने चुकीची किंवा माहिती देण्यास नकार दिल्यास या कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतूद केलेली आहे. यासंदर्भातील माहिती देणे बंधनकारक आहे. आर्थिक गणना अचुकपणे तसेच मुदतीमध्ये पुर्ण करण्याकरीता जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी तसेच सर्व आस्थापनांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे.

या आढावा बैठकीला जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीमती रेखा कुडमुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.बोरकर आदी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*