कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम उद्योगस्नेही असावा : ठाकरे

मुंबई :

राज्यात येणारे खासगी, सार्वजनिक प्रकल्प, नवनवीन उद्योग यांना ज्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ लागते त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विभागाची आणि विभागामार्फत  राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रमांचे जिल्हानिहाय नियोजन करणे गरजेचे आहे. त्या त्या भागातील गरजा, तेथील उद्योग, लघुउद्योग, उत्पादनसाधने आदींची माहिती घेऊन त्या अनुषंगाने अभ्यासक्रमांची आखणी होणे गरजेचे आहे. राज्यात अनेक खासगी, सार्वजनिक, शासकीय असे मोठ-मोठे प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची माहिती घेऊन तसे अभ्यासक्रम आखावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

अनेक ग्रामीण तरुणांना विविध अभ्यासक्रमांची माहिती नसते. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यावी. तसेच उद्योग विभागाशी समन्वय ठेवून विविध उद्योगांना लागणाऱ्या कुशल कारागिरांची माहिती घेऊन ती संबंधीत तरुणांपर्यंत पोहोचविण्यात यावी. तरुणांचा कौशल्य विकास करण्याबरोबरच त्यांना योग्य जागी नोकरी लागेल यासाठीही विभागाने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*