म्हणून बंदरांवर सीसीटीव्ही बसविणार

मुंबई :

अवैध मासेमारी रोखण्यासाठी मासेमारी बंदरांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले. तसेच मासेमारी करताना झालेल्या दुर्घटनेत मच्छिमार मृत्यू पडल्यास त्याच्या कुटुंबियांना इतर विभागाच्या धर्तीवर किमान पाच लाख रुपयांची मदत देण्यासंदर्भात मत्स्य व्यवसाय विभागाने तातडीने नवीन योजनेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

अवैध पर्ससीन मासेमारी, एलईडी मासेमारी तसेच मच्छिमारांच्या विविध समस्यांबाबत श्री. शेख यांनी आज अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, मच्छिमार संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यावेळी आमदार योगेश कदम, मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामास्वामी एन. मत्स्य विकास आयुक्त राजीव जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

शेख म्हणाले की, पारंपरिक मासेमारीला चालना देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. अवैध पर्ससीन मासेमारी व एलईडी दिव्यांच्या सहाय्याने होणारी मासेमारी थांबविण्यासाठी सागरी पोलीस, तटरक्षक दल व मत्स्य व्यवसाय विभाग यांना संयुक्तपणे कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. अवैध मासेमारी टाळण्यासाठी मासेमारी बंदरांवर राज्य शासनाच्या वतीने सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याचधर्तीवर मासेमारी बोटींवरही नौका मालकांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, असे आवाहन श्री. शेख यांनी यावेळी केले.

मासेमारी करताना अपघात झाल्यास मासेमारी संकट निवारण योजनेनुसार एक लाखाची रक्कम तसेच विमा योजनेतून दोन लाख असे तीन लाख रुपयांची मदत मच्छिमारांना दिली जाते. दुर्घटनाग्रस्तांना बंदर विभाग व इतर शासकीय विभागाकडून पाच लाख रुपयांची मदत दिली जाते. त्या धर्तीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून मासेमारी करताना मृत्यूमुखी पडणाऱ्या मच्छिमारांच्या कुटुंबियास पाच लाख रुपये मदत देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी श्री.शेख यांनी दिले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*