अवैध मासेमारी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय..!

मुंबई :

सागरी भागात अवैध मासेमारी करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी आता तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तयारी करीत आहे. त्यानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह इतर मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.

अवैध मासेमारीविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार पोलीस व महसूल प्रशासनास असून हे अधिकार मत्स्य व्यवसाय विभागाकडे घेण्यात येणार आहेत. 12 सागरी मैल ते 200 सागरी मैल यामध्ये होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या कायद्यातही सुधारणा करून अवैध मासेमारी करणाऱ्यांना दंडाची रक्कम वाढविणे, परराज्यातील नौकांना दंड वाढविणे, नौका जप्त करणे या तरतूदी करण्याच्या सूचनाही श्री. शेख यांनी यावेळी दिल्या.

मासेमारी नौकांमध्ये इस्त्रोने तयार केलेल्या व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम अथवा ॲटोमेटिक इन्फॉर्मेशन सिस्टीम यंत्रणा बसविल्यास अवैध मासेमारीला आळा घालता येईल. त्यासंदर्भातही विभागाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

पर्ससीन मासेमारीचा पारंपरिक मासेमारीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी डॉ. सोमवंशी यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालातील उपाययोजनांचा दर पाच वर्षांनी मूल्यमापन करण्याची शिफारस होती. त्या शिफारशीनुसार नवीन समितीची स्थापना करण्याची आवश्यकता असून त्यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना श्री.शेख यांनी यावेळी दिल्या. तसेच साईस्मिक सर्व्हेसंदर्भात ओएनजीसी कंपनीबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ऑगस्ट  ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत झालेल्या वादळामुळे मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. त्याची भरपाई देण्यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. केंद्रीय समुद्री मासेमारी संशोधन संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार मच्छिमारांच्या मागण्याचा विचार करण्याबाबत शासन विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.

वाढवण बंदराबाबत स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. रामास्वामी यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, श्री. वेलेरियन, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल, हर्णेपॉज फिशिंग सोसायटीचे पी. एन. चौगुले, अखिल भारतीय खलाशी संघाचे चेअरमन विश्वनाथ नाखवा, भालचंद्र कोळी आदी यावेळी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*