सामाजिक न्याय सुरू करणार सेंट्रल किचन सेवा..!

मुंबई :
सामाजिक न्याय विभागाच्या राज्यातील सर्व मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये मध्यवर्ती भोजनालय ( सेन्ट्रल किचन ) सुरू करून सकस आहार आणि गरम अन्न विद्यार्थ्यांना देण्यार असल्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात दिली.

विधानसभेत आज नागपूर जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्याबाबतचा प्रश्न आमदार मोहन मते यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी सेंट्रल किचन योजना सुरू करण्याबरोबरच विभागातील वस्तीग्रह च्या बदलाबाबत च्या अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या.

नागपूरातील गड्डीगोदाम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते हा मूळ मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, त्यावर सामाजिक न्याय मंत्री यांनी वसतिगृहाच्या गृहपालाची बदली करण्यात आली असून वसतिगृहातील भोजन पुरवठादारही बदलण्यात आला असल्याची माहिती सभागृहात दिली.

सामाजिक न्याय विभागाच्या सर्व आश्रमशाळा, वसतिगृहांचे महानगरांपासून ते गडचिरोलीच्या शिरोंचापर्यंत आधुनिकीकरण ( अपग्रेडेशन ) करणार असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.

तसेच लवकरच मुला-मुलींच्या वसतिगृहात सीसीटीव्ही बसवून विद्यार्थ्यांना सुरक्षितता देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार संग्राम तुपे, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रवी राणा आदींनी या प्रश्न उत्तरे चर्चेत सहभाग घेतला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*