Blog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..!

करोना विषाणूच्या प्रसारामुळे सध्या जगभरात भितीसदृश स्थिती आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सर्वांना एकोप्याने लढावे लागणार आहे. उगीच जातीय किंवा धार्मिक हेवेदावे ठेऊन किंवा अफवा पसरवून मानवतेच्या विरोधात कृत्य करण्याचे सर्वांनी टाळावे. तसेच भीती न ठेवता शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशी खबरदारी घेऊन मानवतावादास सहकार्य करावे, अशीच भावना बहुसंख्य व्यक्त करीत आहेत. तरीही कुक्कुटपालन व्यवसाय संकटात आणून काहींनी यातही हुल्लडबाजीचा कळस गाठला, हे भूषणावह नक्कीच नाही..!

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

संकटांचे दोन प्रकार असतात, एक मानवनिर्मित तर दुसरे नैसर्गिक. त्यात मानवनिर्मित संकटांमध्येही दोन प्रकार असतात. एक म्हणजे जाणीवपूर्वक निर्माण केलेले आणि दुसरे अजाणतेपणी उद्भवलेले. करोना संकट हे त्यापैकी अजाणतेपणी आणले गेले की ठरवून, याबाबत वादविवाद सुरु झालेले आहेत. याप्रकरणी चीन आणि अमेरिका हे दोन बलाढ्य देश एकमेकांना दूषण देत आहेत. असे असतानाच आता भारत हा विविध जातीधर्माचा देश काहीअंशी का होईना, वितंडवाद विसरला आहे. मात्र, हे तात्पुरते न ठरो, हीच अपेक्षा..!

करोना संकट हे मानवजातीच्या इतिहासात नोंदविलेले पहिले विश्वव्यापी संचारबंदीचे संकट ठरले आहे. यानिमित्ताने सगळे धर्म आपापल्या देवालाही विसरून एकत्रितपणे लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मात्र, तरीही याला देवाचा कोप किंवा इतर काही शब्दांचा खेळ करून धर्माशी जोडले जात आहे. मित्रांनो, देव आणि धर्म याबाबत बोलण्यापेक्षा आपण आतातरी मानवतावाद या विषयावर बोलणार आहोत की नाही. करोना असो नाहीतर कोणताही आजार वा रोग. तो काही एका जातीच्या किंवा धर्माच्या माणसालाच होतो, तर एखाद्या धर्मातील कोणालाही होत नाही असे नाही. तसेच असल्या विषाणूंना कोणत्याही भौगोलिक सीमा अडवू शकत नाहीत. हे सगळे समजून घेऊन आतातरी एक होऊया..!

करोना संकटाने जगाला दैववादी न राहता विज्ञानवादी होण्याचा संदेश दिला आहेच की. सामना या शिवसेनेच्या मुखपत्राने त्यामुळेच जगातील धर्म आणि त्यांचे ठेकेदार यांच्यावर जोरदार प्रहार करणारा अग्रलेख लिहिला. त्यांचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांचे त्यामुळे मानावे तितके आभार कमी आहेत. अशी ठोस भूमिका घेणारे संपादक पत्रकारितेला हवे आहेत. काहींना हेही पटणार नाही. पण विज्ञान हाच आपल्या जगण्याचा आधार बनण्याची सुरुवात झाली ती अग्नीचा आणि चाकाचा शोध लागला तेंव्हाच. मग तरीही आपण या आधुनिक जगात धर्म आणि जाती यांच्या जोखडात अडकून पडणार आहोत का..?

तुम्हीच विचार करा, आणि जे मनाला पटते आणि सिद्ध होऊ शकते तेच मान्य करा..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*