Special Report | तळीरामांची चलती; लाॅकडाऊनलाही न ते घाबरती..!

असे म्हटले जाते की जग बंद होईल, पण व्यसनी मंडळींचे नखरे काही बंद होणार नाहीत. त्याचीच प्रचीती सध्या अहमदनगर जिल्यातील तळीरामांसह गुटखा व खर्रा शौकीनांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनापुढील कामाच्या बोजासह स्थानिकांनी अशा विषयांवर तक्रार करण्याचे टाळल्याने तळीराम आणि अवैध व्यावसायिकांचे फावले आहे. लाॅकडाऊनसारख्या विषयावर देश व सामाजिक हिताला प्राधान्य न देता आपापले व्यसनाचे पदार्थ मिळविण्यासाठी ग्राहक आणि नगर-मनमाड रोडवरील हॉटेल व टपरीवाले व्यावसायिक मग्न आहेत.

अहमदनगर :

जगभरात करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ या आजारामुळे मानव जात धोक्यात आलेली आहे. अशावेळी सर्व भारत देश या संकटाच्या विरोधात एकजुटीने लढत असतानाच काही समाजविघातक घटक आपल्या व्यसनाची हौस पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. हॉटेलमालकांसह काही टपरीवाले व देशी दारूचे विक्रेतेही त्यात पैसा कमविण्याच्या हव्यासाने हात धुवून घेत आहेत. हे दुर्दैवी चित्र कुठे आदिवासी भागात किंवा उत्तर भारतात नाही, तर नगर तालुक्यातील नांदगाव शिवारात पाहायला मिळत आहे.

कुठे गेले यांचे सामाजिक भान..?

सध्या करोना संकटामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाधित झाला आहे. दुध, भाजीपाला यासह किराणा आणि औषधे यांचाही पुरवठा बाधित झालेला आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासह लाॅकडाऊन यशस्वी करण्याचा मोठा ताण जिल्हा प्रशासनावर आहे. मात्र, त्याच प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी व पोलीस यांना मदत करण्याऐवजी नगर-मनमाड भागात राजरोस दारू आणि खर्रा व गुटखा यांची विक्री केली जात आहे. नगर तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये पोलिसांनी लाॅकडाऊन यशस्वी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही यामध्ये मोठे यश मिळवताना नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देत जनजागृती केली आहे. काही सामाजिक संघटना यावेळी गरिबांना मदत करून सामाजिक भान शाबित असल्याचे दाखवीत आहेत. मात्र, अशावेळी नांदगाव शिवारातील अवैध व्यावसायिकांनी सरकारी नियम व आवाहनाला हरताळ फासून नफेखोरीच्या अपेक्षेने दारू, खर्रा, गुटखा यांची अवैध विक्री चालू ठेवली आहे.

तिप्पट भाववाढ करूनही जोरदार मागणी..!

लाॅकडाऊनचा काळ असल्याने सध्या घरात राहून सरकारी यंत्रणेला मदत करण्याची गरज आहे. मात्र, अशावेळी आपली, कुटुंबाची व समाजाची काळजी न घेता उलट सामाजिक भान सोडून व्यसनाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे हे विशेष. सध्या गावात अशा पद्धतीने पोलीस व सरकारी यंत्रणेला लपून-छपून देशी-विदेशी दारू आणि खर्रा यांची विक्री होत असल्याने गावात बाहेरगावाची मंडळी व रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या परराज्यातील वाहनचालकांची मोठी गर्दी होत असल्याचे सरपंच सखाराम सरग यांनी ‘कृषीरंग’कडे फोन करून कळविले आहे. एकूणच गावोगावी कशा पद्धतीने सरकारी यंत्रणेच्या तणावसदृश्य परिस्थितीचा गैरवापर केला जात आहे.

पोलिसांनी केली दणक्यात कारवाई..!

या गावातील हातभट्टी दारूच्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. मात्र, त्याचवेळी रस्त्यावरील हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करणे अपेक्षित असल्याची मागणी सरग यांनी केली आहे. तसेच टपऱ्यांवर खर्रा विक्री सुरु असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरग यांनी केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*