सदाचाराची शिकवण देणारे महावीर..!

अगदी राजेशाही थाटात बालपण गेलेला मुलगा आयुष्याच्या एका टप्प्यानंतर निसर्गाच्या इतका जवळ गेला कि तो साधी लंगोटीही वापरत नव्हता ही सहजासहजी न पटणारी गोष्ट आहे. हाच मुलगा पुढे भगवान महावीर म्हणून ओळखला जाऊ लागला.

लेखक : विनोद सूर्यवंशी, कार्यकारी संपादक, कृषीरंग

जैन धर्मात अहिंसेला प्रचंड महत्व आहे. जैन धर्माचे भगवान महावीर हे अहिंसेला अनन्य साधारण महत्व देत. या अहिंसेचे तत्वामुळे त्यांची ओळख सम्पूर्ण जगाला झाली. भगवान महावीर हे खूप मोठ्या घरात जन्माला आले.

जैन धर्मच्या मोठ्या संत माहात्म्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.ते जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते. महावीरांचे कुटुंबीय जैनांचे तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते.
वैशाली राज्याच्या कुंडलपूर(सध्याचा बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्हा) येथे त्यांचा जन्म झाला. इसवी सन पूर्व 599 मध्ये अगदी राजेशाही थाटात त्यांची वाढ झाली. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते.

वयाच्या आठव्या वर्षी त्यांना शाळेत पाठविण्यात आले. शाळेत ते प्रामुख्याने शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी जायचे. भगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते.

भगवान महावीर यांच्या लग्नाबाबतीत संभ्रम आहेत. मुळातच त्यांनी मोठ्या अभ्यास व साधना केल्यानंतर जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचाही समावेश केला. श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान वर्धमान यांनी यशोदा यांच्याशी विवाह केला होता, तर दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह केला नसून ते ब्रम्हचारी होते.

साधारण भगवान महावीर हे अठ्ठावीस वर्षांचे असताना त्यांच्या आई व वडिलांचे निधन झाले. त्यांनतर दोन वर्षांनी त्यांनी दीक्षा घेतली. हि दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी ध्यान करण्यासाठी जास्त वेळ दिला. ध्यान करत असताना त्यांनी शरीराला कष्ट दिले. त्यातूनच त्यांना आत्मज्ञान प्राप्ती झाली. तब्ब्ल १२ वर्षे त्यांनी मौन धारण केले. या काळात ते एखाद्या हटयोग्याप्रमाणे वागले. आयुष्यातील या अनेक तपांनंतर ही तपश्चर्या फळाला आली आणि शेवटी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले.

या ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले.

देशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला. अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी भौतिक सुखाला थारा दिला नाही. इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांच्या निर्वाणादिवशी घराघरात दिवे लावले जातात.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*