फडणविसांनी व्यक्त केली ‘ही’ भीती; वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

मुंबई :

कोविड-19 च्या तपासणीचे निकष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चप्रमाणे (आयसीएमआर) न ठेवता मुंबई महापालिकेने त्यात केलेल्या बदलांमुळे कोरोनाबाधितांची संख्या कृत्रिमरित्या कमी दिसून प्रत्यक्षात मात्र कोविडचा धोका आणखी वाढू शकतो, अशी भीती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली असून, निकषात बदल न करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्यावतीने कोरोना चाचणीबाबत वेळोवेळी स्पष्ट दिशानिर्देश जारी केले जात आहेत. आतापर्यंत असे एकूण 4 दिशानिर्देश जारी झाले असून, त्यातील 9 एप्रिल 2020 च्या आदेशाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. यातील मुद्दा क्रमांक 5 स्पष्टपणे सांगतो की, ज्या अतिजोखीम व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणं नाहीत, परंतू तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला आहे, अशांची तो/ती संपर्कात येण्याच्या पाचव्या दिवसापासून ते 14 दिवसांपर्यंत एकदा तपासणी करण्यात यावी. हा स्वयंस्पष्ट आदेश असताना मुंबई महापालिकेने 12 एप्रिल 2020 रोजी एक आदेश काढला आणि त्यात अशा अतिजोखमीच्या (हायरिस्क) संपर्कांची तपासणी करण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले. खरे तर आयसीएमआरचेच आदेश राष्ट्रीय पातळीवर सारे पाळत असल्याने त्यात बदल करण्याची काहीच गरज नव्हती. त्यामुळे मुंबई महापालिकेने 12 एप्रिलचा आदेश काढण्याची काहीच गरज नव्हती. तथापि, हा आदेश जारी झाल्यानंतर त्यासंदर्भात विविध माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर पुन्हा एक आदेश 15 एप्रिल 2020 रोजी जारी करण्यात आला. या आदेशाने आणखी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

15 एप्रिल 2020 च्या मुंबई महापालिकेच्या आदेशातील मुद्दा क्रमांक डी-1 आणि मुद्दा क्रमांक डी-4 मुळे संभ्रम निर्माण झाला आहे. एकात चाचणीची गरज नाही, असे म्हटले आहे, तर मुद्दा क्रमांक डी-4 चा अर्थ असा होतो की, अशा अतिजोखीम व्यक्तीला पाचव्या दिवशी  निरीक्षण करून म्हणजेच लक्षणं दिसली तरच त्याची चाचणी करता येईल. याठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते की, चीनमध्ये कोरोनाच्या 44 टक्के केसेसमध्ये लक्षणं नसलेल्या व्यक्तींकडूनच संसर्ग दुसर्‍यांना झालेला आहे. केवळ भाषा बदलली असली तरी यातून मुंबई महापालिकेच्या 12 एप्रिल 2020च्याच आदेशाचा अर्थ कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अतिजोखमीच्या रोगाची लक्षणे नसलेल्या व्यक्तीची तपासणी होण्याची शक्यता दिसत नाही आणि ती केली नाही तर कुणाला जबाबदार सुद्धा धरता येणार नाही. यामुळे आगामी काही दिवसांत मुंबईतील रूग्ण सांख्यिकीदृष्ट्या कमी दिसण्यास यामुळे मदत मिळणार असली तरी त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मात्र कोणतीही मदत होणार नाही. जे व्यक्ती कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले आहेत, त्यांच्या संपर्क आणि संसर्गातून नवीन लोक कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने सुद्धा आयसीएमआरच्या धर्तीवर स्वयंस्पष्ट दिशानिर्देश जारी करावेत. कोरोनाग्रस्तांची संख्या कृत्रिमपणे कमी करण्याचा असा प्रयत्न लाखो लोकांच्या जीवनासाठी घातक ठरू शकतो. मुंबई महापालिकेला आपली ही रणनीती बदलण्यासाठी आपण निर्देश द्याल, अशी मला आशा आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती करताना म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*