RBIचेही न ऐकणार्‍या बँका राज्य सरकारचे ऐकणार का : राजू शेट्टी

कोल्हापूर :

करोना हे मोठे संकट समोर असताना शेतकऱ्यांना दिलासा देणारे एक पाउल सरकारने उचलले असून आता राज्यातील थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसह सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवे कर्ज देण्याच्या सूचना राज्य सरकारने जिल्हा बॅंकांसह व्यापारी आणि ग्रामीण बॅंकांना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आरबीआयचे न ऐकणार्‍या बँका राज्य सरकारचे ऐकून शेतकर्‍यांना खरीपासाठी कर्ज देतील का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात लोक आर्थिक संकटात असल्याने ६ महिने व्याजाची वसुली करू नका, असे निर्देश बँकांना आरबीआयने दिले आहे. तरीही बँका त्यांचे न ऐकता कर्जदारांकडून वसुली करत आहेत. अशावेळी सरकार म्हणते आहे की, शेतकऱ्यांनी कर्जापोटी घेतलेल्या पैशांची आम्ही हमी देतो. पण केवळ शासनाकडून येणे दर्शवून बँका शेतकर्‍यांना पीक कर्ज देणार नाहीत.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, जिल्हा बँका वसुली अभावी अडचणीत आल्या आहेत. त्यांच्याकडेच पैसे नाहीत. याला पर्याय म्हणून सांगताना शेट्टी म्हणाले की, राज्य सरकारने नाबार्ड कडे तशी मागणी करावी. राज्य सरकारने नाबार्डकडे संबंधित कर्जाच्या रक्कमेसाठी हमी द्यावी. त्यानंतर नाबार्डने कर्ज स्वरूपात सदर रक्कम शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात जमा करावी. तसेच संबंधित व्याजाच्या रक्कमेसाठी देखील राज्य सरकारने हमी देणे गरजेचे आहे.

यावेळी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना अडचणीत आणल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही सरकारला दिला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*