सैराटच्या परशाच्या नावाने फेक अकाउंट काढून त्याने केले ‘हे’

अहमदनगर :

सैराटचा परशा फेसबुकवर तुमच्याशी लाडलाडाने बोलत असेल, निवांत गप्पा मारत असेल आणि चक्क तुमच्याशी फोनवरही बोलणे सुरु करून तुम्हाला पैसे मागत असेल तर सावधान… तो परशा नसून तोतया आहे. अशीच एक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. सैराटचा परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते बनवून नगरमधील एका महिलेची फसवणूक करणाऱ्या भामट्याला आज अहमदनगर सायबर सेलने अटक केली आहे. या आरोपीचे नाव शिवतेज नेताजी चव्हाण असे असून तो पिंपरी चिंचवडचा राहणारा आहे.

एमआयडीसी भागात राहात असणाऱ्या एका महिलेशी या भामट्याने आकाश ठोसर म्हणून संपर्क केला. मग पुढे मैत्री वाढविली. हळूहळू फोनवर संवाद चालू झाला. मग अधून मधून चालू असलेले बोलणे चांगलेच वाढले. पुढे त्याने आर्थिक अडचणीत असल्यने पैशाची गरज व्यक्त केली. आता एवढा मोठा हिरो पैसे मागतोय म्हटल्यावर कोण नाही म्हणणार आणि कसे नाही म्हणणार?. मग लगेचच त्या महिलेने पैसे देण्याची तयारी दाखवली. यानेही ‘पैसे घ्यायला नगरला येतो’ असे सांगितले.

आता आकाश आपल्याला भेटणार म्हणून ही महिला आनंदित होती. ऐनवेळी आकाशने मला जमणार नाही, मित्राला पाठवतो, असे म्हणत हा तोतया स्वतः नगरला आला आणि आकाशच मित्र म्हणून या महिलेकडून दागिने घेऊन गेला. मग थोड्याच वेळात आकाशचा फोन बंद येऊ लागला. फेसबुक खातेही बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेनी अहमदनगर सायबर पोलीसांशी संपर्क साधला. आज त्याला पोलिसांनी अटक केली.     

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*