शेकडोंची गर्दी जमली म्हणून ‘या’ आमदारावर गुन्हा दाखल

अमरावती :

गेली अनेक वर्षे रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम चालू असताना युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, शासनाची कुठलीही परवानगी न घेता, संचारबंदी लागू असताना रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षानुवर्षे या पुलाचे काम रखडलेले होते. ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. तसेच या पुलाची अधिकृत चाचणीसुद्धा झालेली नाही. अशातच आमदार रवी राणा व युवा स्वाभिमान पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी पुलाचे उद्घाटन केले.

उद्घाटन केल्यानंतर त्यांनी गरजू ऑटोचालकांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. त्यावेळी तिथे शेकडो लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे शनिवारी रात्री आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम १८८, २६९ नुसार संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्ते आणि ऑटो रिक्षाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वाहतुकीसाठी हा पूल खुला होईल
चाळीस वर्षांपासून रखडलेला व शहराच्या दोन्ही भागाला एकत्रित करण्यासाठी हा पूल आवश्‍यक होता. उड्डाणपुलाचे लोकार्पण आपल्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण आहे. येत्या आठवड्यात सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी हा पूल खुला होईल.
– रवी राणा,
आमदार, बडनेरा मतदारसंघ

शेकडोंची गर्दी झाली
उद्‌घाटनाला परवानगी नव्हती. शिवाय कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असताना उड्डाणपुलावर धान्य कीट वाटप करताना शेकडोंची गर्दी झाली. त्यामुळे आमदार रवी राणांसह त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पूल वाहतुकीसाठी बंद आहे.
– किशोर सूर्यवंशी,
पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*