सामना अग्रलेख : या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली आहे ती अशी…

मुंबई :

आज सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेनं पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अनेक राजकीय घटनांचा, गोष्टींचा उहापोह केला आहे.

नेमके काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात :-

सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून निधी मिळाला. चीन व काँग्रेसचे नाते काय? असे प्रश्न भाजपकडून विचारण्यात आले. यावर काँग्रेसने प्रतिटोले मारले. पंतप्रधान केअर्स फंडला चिनी कंपन्यांकडून शेकडो कोटी रुपये आले आहेत व सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या खात्यातही चिनी कंपन्यांकडून पैसे जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. म्हणजे आम्ही म्हणतोय तो मुद्दा हाच आहे. चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे.

आपल्याला चीनशी लढायचे आहे. हे बहुतेक सगळेच विसरलेले दिसतात. या सगळ्या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली आहे ती अशी की, ‘देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे विषयांत कोणी राजकारण करू नये. हे बरे नाही.’ पवार यांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनाच लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे. चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो. चीनप्रश्नी राजकारण कोणीच करू नये. पण असे राजकारण नक्की कोण करीत आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. हेच प्रश्न कदाचित शरद पवार यांच्याही मनात घोळत असतील. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*