विसरा ‘तो’ भूतकाळ; शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावले

मुंबई :

आज सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेनं पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अनेक राजकीय घटनांचा, गोष्टींचा उहापोह केला आहे.

नेमके काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात :-

चीनने आमच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, मग 20 जवानांचे बलिदान का झाले? चीन आमच्या हद्दीत घुसला आहे काय? हे सर्व प्रश्न तर आहेतच. यावर पंतप्रधानांचे ठाम उत्तर असे आहे की, ”हिंदुस्थानच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना सडेतोड आणि ठोस उत्तर मिळाले आहे.” पंतप्रधान जे बोलले ते बरोबर आहे. चीनचे नाव न घेता पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या शंकेचे निरसन केले आहे. त्याच वेळी ‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान कोरोना आणि चीनविरुद्धच्या लढाया जिंकणार आहे,’ असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. श्री. शहा यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी या दोन्ही लढायांवरच आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधी पक्ष काय आदळआपट करीत आहे त्याकडे लक्ष देऊ नये.

त्यांनी रोगाशी लढावे. रोग्यांशी लढून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवू नये. विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्न-तोफांनी इतके अस्वस्थ होण्याचे कारण नाही. ‘चीनच्या मुद्यावर कोणत्याही चर्चेला घाबरत नाही. 1962 पासून हिंदुस्थान-चीन संबंधांवर आपण संसदेत बोलायला तयार आहोत,’ असे गृहमंत्री शहा यांनी जाहीर केले. खरे म्हणजे, 1962 पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय? विसरा तो भूतकाळ. चीनचे संकट नव्याने उसळले आहे व आपल्याला त्याच्याशी वर्तमानात सामना करून राष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे.

पंडित नेहरूंनी 1962 साली चुका केल्या असतीलही, तुम्ही 1962 सालात का रांगताय? आता 2020 उजाडून जग पुढे गेले आहे. चीनप्रश्नी आजच्या सरकारने ठाम भूमिका घेतली हे महत्त्वाचे. पंतप्रधान नेहरू असतील किंवा मोदी, चीनचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार आहे. पंडित नेहरू हे वेगळ्याच आदर्शवादाने भारून गेलेले नेते होते. ‘सत्यमेव जयते’ या हिंदुस्थान सरकारच्या ब्रीदवाक्यावर त्यांची भाबडी श्रद्धा होती. पंतप्रधान मोदी यांचा आध्यात्मिक शक्ती आणि बंधुभावावर विश्वास आहे. संकट कितीही मोठे असले तरी हिंदुस्थानचे संस्कार हे निःस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नाही. मोदी चीनविषयी बोलतात व त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात. कुछ तो गडबड है! कोरोनाप्रमाणे ‘ट्यून’ येथेही बदलायलाच हवी!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*