रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे…

मुंबई :

आज शिवसेनेनं सामनाच्या माध्यमातून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसने केलेल्या कामामुळेच धारावी करोनामुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या भाजपा नेत्यांवर टीका केली आहे.

नेमके काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात :-

“आज धारावीतून कोरोना पूर्णपणे हटला असा दावा नाही, पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले हे जागतिक आरोग्य संघटनेने कबूल केले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व करोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे, पण ‘‘धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!’’ असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. पांढऱया कपडय़ांतील देवदूतांचा अपमान आहे. म्हणजे काही चांगले घडले की, आमच्यामुळे! रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे. हे असले प्रकार यांना संकटसमयी सुचतात तरी कसे?,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“संघाचे काम चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील करोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचे अस्तित्व आहे, मग तेथे संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही? त्यामुळे संघाला करोना युद्धात उगाच ओढण्याचे कारण नाही. प्रत्येक जण आपापल्या कुवतीने लढतो आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*