दखलपात्र | ‘पंचशील’ तत्वांनी प्रेरित महिला झाल्यात करोना मृतदेहाचा आधार; नातेवाईकांच्या नकारानंतर घेतात जबाबदारी

सुप्रसिद्ध विचारवंत भगवान गौतम बुद्ध यांनी मानवतावादी दृष्टीकेनातून जगण्याचा संदेश दिला. त्यांनीच जीवनातील पाच महत्वाचे गुण सांगणारे पंचशील विचारही सांगितले. अशाच विचारांनी प्रेरित झालेल्या औरंगाबाद येथील महिला करोना विषाणूच्या या आपत्कालीन काळात समाजाचा आधार बनल्या आहेत. त्याचीच ही दखलपात्र कथा..!

औरंगाबाद शहरात आतापर्यंत करोना विषाणूची बाधा झाल्याने ३४० जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी सुमारे २०० मृत शरीरांना स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. मग त्यांचे अंत्यसंस्कार कोणी केले, असाही प्रश्न मनात आलाय ना..! होय, ते साहजिकच आहे.. उत्तरक्रिया करण्याचे सोपस्कार पार पडलेत एका महिला बचत गटाने..! पंचशील महिला बचत गट..! सामाजिक कार्याचा हा वेगळा आदर्श या गटाने जगासमोर ठेवला आहे.

अशी घेतात काळजी..

यावर पुढारी वृत्तपत्राने विशेष बातमी केली आहे. पत्रकार भाग्यश्री जगताप यांनी ही स्टोरी लिहिली आहे. औरंगाबाद महानगरपालिका यांनी कोविड १९ मुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांना कुटुंबियांना देण्यासह जे असे मृतदेह स्वीकारणार नाहीत त्यांच्यासाठी पंचशील महिला बचत गट आणि पॉप्युलर फंड ऑफ इंडिया या दोन स्वयंसेवी संस्थाना जबाबदारी दिलेली आहे. करोनाच्या भीतीने नातेवाईक मृत शरीर स्वीकारण्यास बऱ्याचदा तयार नसतात. अशावेळी मग पंचशील गटाच्या महिलांकडे ही जबाबदारी येते. त्या पीपीई कीट वापरून हे सगळेच सोपस्कार पार पडतात. तेही शास्त्रशुद्ध पद्धतीने.

२००७ पासून हा महिला बचत गट बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे. आताही तेच काम अधिक कोविड १९ च्या मृतांसाठीही काम करीत आहे. मृतदेह आणताना या महिला अगोदर गाडी (अॅम्ब्युलन्स) निर्जंतुक करतात. मग, पीपीई कीट वापरून सर्व कार्यवाही केली जाते. नंतर पुन्हा गाडी निर्जंतुक केली जाते. घरी आल्यावर कुटुंबियांशी संपर्क न ठेवता त्या राहतात. तसेच घरी आल्यावर अगोदर त्या अँटिसेप्टिक लिक्विड टाकलेल्या पाण्याने अंघोळ करतात. असा त्यांचा दैनंदिन नित्यक्रम चालू आहे.

यावर त्या सांगतात की, आम्हीही कधी ना कधी या जगाचा निरोप घेणार आहोतच की.. किमान जिवंत असताना समाजासाठी काम करून समाधानाने तरी जगू..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*