निळू फुले | हेडमाळी ते थेट ‘सुपर पाटील’ बनलेल्या अवलियाची भन्नाट कथा; वाचा अन शेअर करा

अकरा वर्ष कॉलेजमध्ये काम करणारा माळी ते मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता असा थक्क करणारा प्रवास करणारे महाराष्ट्राचे सिने जगतातील लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे निळू फुले.

निळू फुले यांनी मेट्रिक करत असताना एक पुण्याच्या बॉटनिकल गार्डनमधील माळी कामाचा डिप्लोमा केलेला होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत कुटुंबातील कर्त्या सदस्याला तुरुंगवास झाला आणि चांगलं सुखवस्तू असणारे कुटुंब आर्थिक संकटात सापडले. मॅट्रिकचे पेपर न देताच शाळा सोडली. त्यावेळी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदलेले होते. घरी पत्र आले आणि अर्मड फोर्सेसच्या ऑफिस ठिकाणी बाल गंधर्व यांचे जावई कर्नल वाबळे यांनी निळू फुले यांना बोलावले. आणि दोन मिनिटांच्या संवादानंतर सरळ हेडमाळी करून टाकले.. अशा प्रकारे हेड माळी म्हणून निळू फुले यांनी बरेच दिवस काम केलं.

संपादन व लेखन : गणेश शिंदे सरकार, पाथर्डी, अहमदनगर

माळी काम करत असताना नाटक आणि वाचन याकडे निळू फुले आकर्षित झाले. तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. निळू फुले यांचा एक किस्सा नक्की सांगायला हवा. दोन बायकांचा दादाला, लवंगी मिरची कोल्हापूरची अशा चित्रपटात निळू फुले यांनी चांगलं काम केलं होते. “एक गाव बारा भानगडी”मुळे निळू भाऊ यांच्या बद्दल लोकांनां मोठं कुतूहल निर्माण झालेलं. एकदा निळू फुले आणि त्यांची टीम “कथा अकलेच्या कांद्याची” या नाटकाच्या प्रयोगासाठी लातूरला निघाले होते. गाडी स्टेशनला लागली अन निळू भाऊ ट्रेनमध्ये बसले आणि एकदमच बाहेर आरडा ओरडा झाला. महाभयंकर गर्दी गोळा झाली. निळू फुले डब्यात निवांत बसलेले. बाहेर प्रसिद्ध मंडळीला पाहून झाली असेल आपल्याला काय करायचं अशा आविर्भावात. मात्र, चार-पाच पोलीस शिपाई आणि एक पोलीस इ्स्पेक्टर डब्यात शिरले आणि निळू फुले यांना म्हणाले की “मारतात का आम्हाला..?” असे बोलत निळू फुले यांना फरफटत बाहेर आणले. लोकांच्या, गर्दीच्या समोर उभा केले. निळू फुले खाली जमिनीवर पाय ठेवणार की लोकांनी जल्लोष केला आणि खांद्यावर बसवून मिरवणूक काढली असे मोठ्या आनंदाने सांगायचे निळू फुले.

निळू फुले यांनी मराठी मध्ये १७० च्या आसपास चित्रपट केले तर, हिंदीमध्ये १२ – १३ चित्रपट केले. आजही मराठी मधील “सिंहासन, सामना, चोरीचा मामला, शापित” या चित्रपटांची नावे प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. तसेच निळूभाऊ फुले हे हाडाचे नाटककार. त्यांनी सखाराम बाईंडर, कबुतर, बेबी, जंगली अशी चर्चेत असणारी अप्रतिम नाटके केली. आजही तितक्याच आवडीने या नाटकांचे नाव घेतले जाते. आजही त्यांचे डायलॉग मराठी मध्ये हिट आहेत; इतकी रुबाबदार संवादफेक फक्त निळू फुलेच करू शकतात असे आजही मराठी मधील चित्रपट रसिकांना वाटते..!

*(अरुण शेवते यांच्या “हाती ज्यांच्या शून्य होते” या पुस्तकातून संदर्भ घेतलेले आहेत)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*