Blog| श्रद्धेचा आणि जीवनसंस्कृतीचा भाग राजकीय नको की व्हायला

धर्म आणि आस्था यांचा राजकीय कारणासाठी वापर करण्याची वेळ या आधुनिक जगातही माणसांना येते. हे सुदैव की दुर्दैव, हे ज्याचे त्याने ठरवावे. कारण, आपण सगळे १८ वर्षे पूर्ण केली म्हटल्यावर सुज्ञ आहोत की. पण असाच विचार मांडण्याचा आणि त्यालाही विरोध करण्याचा हक्क भारतीय लोकशाहीने आपल्याला दिला आहे. सामाजिक व राजकीय विषयाचे अभ्यासक अजित वायकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर अशीच एक वेगळी आणि विचार करायला लावणारी मांडणी केली आहे. आम्ही वाचकांसाठी ती जशीच्या तशीच प्रसिद्ध करीत आहोत..

बिहारचं वाल्मिकीनगर अभयारण्य व नेपाळचं चितवन नॅशनल पार्क एकमेकांना लगटून आहेत. शिवालिक पर्वतरांगेच्या दऱ्या-खोऱ्यांतून झेपावत तराईत उतरणारी नारायणी नदी स्वतःला स्थिरस्थावर करते. इथं तिला आणखी छोट्या-छोट्या नद्या मिळतात. एखाद्या खट्याळ तरूणीच्या पायांनी मन मानेल तशी वाट पकडावी, तशा त्यांच्या धारा इथं इतस्ततः वाहतात. हे सारे बेशिस्त प्रवाह एकत्रित होऊन भारतात गंडकच्या रूपाने प्रवेश करतात. तेव्हा मात्र ही नदी धीरगंभीर आणि पोक्त दिसते. म्हणून तिला बुढी गंडक म्हणतात.

या वाल्मिकीनगर अभयारण्याच्या गेस्ट हाऊसमध्ये दोन दिवस राहिलो होतो. तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलेलं की, परिटाच्या टोमण्यांनंतर रामाने सोडलेली सीता इथल्याच वाल्मिकी आश्रमात येऊन राहिली होती. तुम्ही पाहून घ्या तो परिसर…गंडकला मिळणाऱ्या एका उपनदीच्या उथळ पात्रातून चालत आम्ही नेपाळच्या हद्दीत दाखल झालो. चितवन अभयारण्याच्या या गर्द वनराईतच वाल्मिकी आश्रम, सीतेची कुटी, तिचं स्वयंपाकघर, लव-कुशाची खेळण्याची जागा आणि रामायणात नमूद केलेली महत्त्वाची स्थळं आहेत, अशी इथल्या जनतेची श्रद्धा आहे. तशा पाट्याही इथं लावण्यात आल्या होत्या. अद्यापही त्या असतील. अगदी सीतेचं माहेर समजलं जाणारं जनकपूरही इथून जवळच आहे.

आपल्याकडंही अशी ठिकाणं भरपूर आहेत. रावणाने लंकेत पळवून नेलेल्या सीतेचा शोध घेण्यासाठी निघालेला राम विश्रांतीसाठी आपल्या दऱ्यात थांबला होता, अशी माझ्या गावकऱ्यांची श्रद्धा आहे. या गावकऱ्यांसह आजूबाजूच्या अनेक देशांतल्या नागरिकांत रुजलेल्या रामविषयक श्रद्धेचा परीघही तेवढाच व्यापक आणि दाट आहे. कारण, भारतात निर्माण झालेल्या या महाकाव्याने नेपाळसह पंजाब-काश्मीरमार्गे तिबेट, चीन आणि मध्य आशियाचा रस्ता पकडला. पूर्वेकडे त्याने ब्रम्हदेश, थायलंड अशा देशांमध्ये मूळ धरले. दक्षिणेतून ते अकराव्या शतकात चोलांमार्फत श्रीविजय साम्राज्यात पोहोचले. आताचा इंडोनेशिया म्हणजे तेव्हाचं श्रीविजय. तिथून ते व्हिएतनाम व कंबोडियातही दाखल झाले.

रामायणाचे जगभरात ३०० प्रकार आहेत. सगळे त्या-त्या लोकांच्या श्रद्धेचा आणि जीवनसंस्कृतीचा भाग आहेत. पण, रामाला राजकीय करून टाकणारे आपण या सर्वांत एकमेवाद्वितीय आहोत. प्राचीन महाकाव्याचं बोट धरून आधुनिक जीवनप्रश्नांना आपण भिडू पाहतो, हा विरोधाभासही इथल्या उच्चशिक्षितांना समजून घ्यायचा नसतो. रामाच्या खांद्यावर धनुष्य ठेवून राजकीय लक्ष्य अचूक वेधणाऱ्या भाजपमुळे १९९२च्या डिसेंबर आणि १९९३च्या जानेवारीत सुमारे ३ हजार भारतीय मारले गेले, याचाही आपल्याला विसर पडतो. त्यामुळे नेपाळचे पंतप्रधान ओली असोत किंवा हिरीरीने त्यांना प्रत्युत्तर द्यायला सरसावलेली भारतीय मंडळी…रामाला राजकीय आखाड्यात उतरवलं की भितीनं छातीत जोरदार कळ उठते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*