ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलटसारखी ‘ती’ फूट नव्हती; शिवसेनेचा टोला

मुंबई :

आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार, स्वातंत्र्यसाठीचे योगदान, त्यांचे महान कार्य याविषयी भाष्य करण्यात आले. तसेच तत्कालीन परिस्थितीशी आजचे संबंध जोडत राजकीय भाष्यही केले आहे.

नेमके काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात :-

टिळक जाऊन शंभर वर्षे झाली, पण राम, कृष्ण, शिवाजीराजे यांच्याप्रमाणे टिळक आपल्यातच आहेत. टिळक जन्मले कोकणात, त्यांनी राजकारण केले पुण्यातून, देह ठेवला मुंबईच्या सरदारगृहात, पण हा सिंहपुरुष इंग्लंडपासून कराचीपर्यंत स्वराज्य व स्वाभिमानासाठी गर्जना करीत फिरत होता. ‘जेव्हा सारे जग निद्रावस्थेत पहुडलेले असते तेव्हा संयमी महापुरुषच जागृतावस्थेत असतात’ ही गीतेची धारणाच टिळकांच्या जीवनाचे मर्म होते. टिळक राजमान्य नव्हते म्हणून ते लोकमान्य ठरले. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांनी देह ठेवला. टिळकांच्या आजारपणात देशाच्या समाजमनाच्या हृदयाचे ठोके मंद झाले होते व त्यांच्या निधनाच्या बातमीने देश काही काळ निस्तेज झाला. त्यानंतर 27 वर्षांनी देश स्वतंत्र झाला, पण त्या विजयाची पायाभरणी टिळकांनी करूनच ठेवली होती. ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ असे इंग्रजांच्या तोंडावर सांगणारा व परिणामांची पर्वा न करणारा हा योद्धा होता.

टिळकांच्या वाणीत व लेखणीतही आग होती. त्या आगीतून क्रांतीच्या ठिणग्या देशभर उडाल्या. ‘केसरी’त आपली मते मांडताना त्यांनी स्वभावास मुरड घातली नाही. टिळकांनी परखडपणे सांगितले आहे (1902), ”आम्ही ‘केसरी’त जे लेख लिहीत असतो ते केवळ राज्यकर्त्यांकरिता नसून आमच्या मनातले विचार, आमच्या मनातील तळमळ किंवा जळफळ सर्व मराठी वाचकांच्या मनात उतरावी एवढ्याकरिता आहे व आमच्या लेखांचा जर असा परिणाम होत नसेल तर आमचे श्रम फुकट गेले असे आम्ही समजू. लेखणीच्या टोकाने व मषीपात्राच्या सहाय्याने पांढऱयावर नुसते काळे करण्याचा आमचा इरादा नाही.

” टिळकांनी तेव्हा जे सांगितले ते आजच्या काळातही लागू पडते हे महत्त्वाचे. टिळकांनी तोंडपुंजेपणा केला नाही. राज्यकर्त्यांचा तोंडपुंजेपणा हा प्रकार देशाच्या हितास अपायकारक होय असे टिळकांचे मत होते. 1905 च्या चळवळीत कित्येक लोक तुरुंगात गेले, कित्येक क्रांतिकारक फासावर गेले. लोकमान्यांना शिक्षा झाली. त्यांना सात वर्षे मंडालेत नेऊन टाकले. याच काळात काँग्रेसला तडे गेले, पण काँग्रेस ध्येय, कार्यक्रमाच्या मुद्द्यांवर फुटली. आज ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट वगैरे मंडळी फुटतात त्यातली ही फूट नव्हती. ‘स्वराज्य’ हेच ध्येय आहे व हा शब्द वापरायचा की नाही यावर मारामारी झाली. म्हणजे काँग्रेसच्या चळवळीची दिशाहीन वृत्ती पुढे चालवू पाहणार्‍यांचा एक गट आणि देशातील जनतेला चळवळीत ओढून बलदंड आंदोलन ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध उभे करणारा जहाल विचारांचा दुसरा गट असे दोन गट निर्माण झाले. 1907 च्या सुरत काँग्रेसमध्ये मवाळ-जहाल असे गट पडले.

जनतेच्या चळवळीत फूट पडली. इंग्रजांनी एका गटाला उचलून तुरुंगात टाकून निकालात काढले. जहाल गटावर टिळकांचा प्रभाव होता. त्यांना टिळकांचे धोरण सनदशीर मार्गाने चालवायचे होते. तो गट म्हणायचा, ”उठाव बिठाव काही जमायचा नाही. जनतेला जागृत करून, संघटित करून हळूहळू पुढे नेले तर चळवळ फोफावू शकेल.” दुसरा गट क्रांतिवाद्यांचा होता. ”हातात शस्त्र घेऊन इंग्रजांना सरळ मारले पाहिजे, दहशत निर्माण केलीच पाहिजे” असे म्हणणार्‍यांचा. टिळकांनी या क्रांतिवाद्यांना अनेकदा मदत केली आहे. रँडचा खून करणारे चापेकर बंधू हे टिळकांचेच अपत्य. स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण ही टिळकांची चतुःसूत्री होती. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*