राष्ट्रवादीला करावी लागणार गणिताची फेरमांडणी; विरोधी मतदानाचा नगरमध्ये टक्का मोठा

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने नगर जिल्हा राष्ट्रवादीचे खऱ्या अर्थाने धाबे दणाणले आहे. कागदोपत्री सर्वाधिक ताकदवान (जिल्हा परिषद, पंचायत समिती व नेत्यांच्या गोळाबेरीज करता) वाटणारा हा पक्ष लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने हरला. नगर शहरातही राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना अपेक्षित मतदान झाले नाही. अशावेळी या विधानसभा निवडणुकीत शहरातील गणिताची जुळवाजुळव राष्ट्रवादी कशी करणार, यावर निकालाची भिस्त राहणार आहे.

आमदार अरुण काका जगताप व त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप यांची शहरातील स्थानिक राजकारण व महापालिका प्रशासनावर पकड आहे. मात्र, तरीही मागील विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुकीत जगताप यांना नगर शहरातून एकहाती मतदान फिरविणे शक्य झालेले नाही. त्याचाच परिणाम म्हणून यंदा जगताप पक्षबदल करून शिवबंधन बांधणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. त्यात कितपत तथ्य आहे, हे महिनाभरात स्पष्ट होईल. मात्र, येथून विधानसभा निवडणूक विजयाचे गणित राष्ट्रवादी कशी जुळवणार, हाच मुख्य मुद्दा आहे.

मागील निवडणुकीत राज्यभरात चौरंगी लढती झाल्या. नगर शहरातील लढतीत त्यावेळी तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांना सर्वाधिक मतदान मिळाल्याने ते आमदार झाले. त्यांना फ़क़्त ३ हजार ३१७ मतांनी निसटता विजय मिळाला. कॉंग्रेसच्या विरोधी लाटेतही त्यांनी हा विजय मिळवला, हे विशेष. मात्र, लोकसभा निवडणुकीत अपेक्षित मतदान मिळविण्यात तरीही राष्ट्रवादी कमी पडली. परिणामी माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या अपेक्षांना पुन्हा धुमारे फुटले. निसटता पराभव झाल्यावरही राठोड यांनी आपली राजकीय ताकद कमी होऊ न देता महापालिका निवडणुकीत सेनेला सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर ठेवले. मात्र, आता सेनेमध्ये इच्छुक वाढलेले असल्याने, त्यांना तिकीट मिळणार की नाही, याचीच उत्सुकता मतदारांमध्ये आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना ४९,३७८ मतदान मिळाले होते. तर, त्याखालोखाल माजी आमदार राठोड यांना ४६,०६१, भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांना ३९,९१३ आणि कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना २७,०७६ मतदान मिळाले होते. मागील मतदान लक्षात घेता येथून युतीला ही जागा सोपी आहे. मात्र, तरीही कॉंग्रेसच्या विरोधातील लाट संपली असतानाच आता लोकसभेपेक्षा मतदार वेगळी मोजपट्टी लावण्याची शक्यता गृहीत धरून येथून राष्ट्रवादी मोर्चेबांधणी करीत आहे.

त्यातच आमदार जगताप यांनी पक्षबदल करून सेनेची साथ दिल्यास येथून राष्ट्रवादीला कोण उमेदवार द्यावा, याचे मोठे कोडे पडणार आहे. अशावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा एकमेव पर्याय पक्षापुढे असेल. ते आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या साथीने कसे गणित जुळवितात किंवा फेरमांडणी, यावर निकालाची भिस्त असेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*