रोहित पवारांच्या एन्ट्रीला विखे रोखणार..!

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीत देशभरात कॉंग्रेसची आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीची झालेली दुर्दशा लक्षात घेता आता भाजपची महत्वाकांक्षा भरमसाठ वाढली आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्हा भगवा करण्याची घोषणा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. तर, २४ हजारांचे मताधिक्य देत पालकमंत्री राम शिंदे यांनी ग्राउंड पक्के असल्याचा संदेश दिला आहे. अशावेळी राष्ट्रवादीचे युवे नेतृत्व रोहित पवार यांना कर्जत-जामखेडच्या ग्राउंडवरून विधानसभेत एन्ट्री मिळणार की भाजप त्यांना रोखणार अशीच चर्चा जिल्ह्यात आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या कुटुंबातील दोघेजण रिंगणात होते. त्यातील युवा नेतृत्व पार्थ पवार (माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र) यांचा मावळ मतदारसंघात मोठा पराभव झाला. तर, विरोधी लाटेतही खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीची जागा मोठ्या मताधिक्याने राखली. एकूणच राष्ट्रवादी व काँग्रेस यांना बेतास-बात यश मिळाले असतानाच पवार कुटुंबातील उमेदवार पराभूत होऊ शकतो, असाच संदेश या निवडणुकीने राज्याला दिला. तर, नगर जिल्ह्यावर अजूनही विखे कुटुंबियांचे वर्चस्व याच निवडणुकीने पुन्हा अधोरेखित केले.

अशावेळी खासदार विखे यांना वडील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची आणखी ताकद पुढील काळात मिळणार आहे. तर, जिल्ह्यातील सर्व जागा भाजप-शिवसेनेला जिंकून देण्याचा विडा विखे कुटुंबीयांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ताकद देताना आपली ताकद वाढविण्यासाठी विखेंनी कर्जत-जामखेड मतदारसंघात विशेष लक्ष देण्याचे जाहीर केले आहे. खासदार विखे व पालकमंत्री शिंदे यांना आव्हान देण्यासाठी यंदा रोहित पवार यांनी आक्रमकपणे टायरी केलेली आहे. येथे विजय मिळवून विधानसभेतील एन्ट्री पक्की करण्याचा रोहित पवार यांचा निर्धार आहे. तर, खासदार विखेंनी सर्व जागा भगव्या करून टाकण्याची घोषणाही करून टाकली आहे. पालकमंत्री शिंदे यांनीही कामाचा झपाटा लावून विजयासाठीची तयारी केली आहे. त्यात कोणाचा विजय होणार, आणि कोणाचा पराभव, हे विधानसभा निवडणूक निकालातुनच स्पष्ट होईल. तोपर्यत चालतील फ़क़्त चर्चा व गावगप्पा..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*