जॉर्ज ऑरवेल : राजकीय भविष्य मांडणारा अवलिया नव्हे ऑर्व्हेलिया..!

व्यवस्था लोकांचे सर्व अधिकार हिरावून घेते.. त्या व्यवस्थेत नागरिकांवर सतत पाळत ठेवली जाते.. तिची मुल्ये ही वेगळी असतात.. युद्ध म्हणजेच शांतता.. स्वातंत्र्य म्हणजेच गुलामी.. अज्ञान हीच शक्ति.. या ‘ठोस’ पायावर आधारित अशी ही व्यवस्था असेल… असे १९४९ मध्ये लिहिताना भविष्यातील १९८४ वर ठळक भाष्य करणारा जगप्रसिद्ध विचारवंत, लेखक व पत्रकार म्हणजे जॉर्ज ऑरवेल. आज या अवलिया (ऑर्व्हेलिया) व्यक्तिमत्वाचा स्मृतिदिन. त्यानिमिताने मराठी भाषिक वाचकांसाठी त्याची माहिती देत आहोत.

आज जॉर्ज ऑरवेल या ब्रिटिश लेखकाचा आज स्मृतिदिन आहे. त्याच्याबाबत इथे लिहण्याचे कारण म्हणजे त्याची मांडणी ही फक्त ब्रिटन या एका देशापुरती मर्यादित नसून संपुर्ण जगाला विचार करायला भाग पाडणारी आहे. त्याच्या ऑरवेलियन राज्याची संकल्पना आता अस्तित्वात येत आहे की काय, असाच विचार आज संपुर्ण जगात होताना दिसत आहे. त्याची ही संकल्पना २० व्या शतकात २१ व्या शतकाबाबत भविष्यवाणी करणारी होती. त्याचा विचार हा काळाच्या पुढचा होता. तसेच ऑरवेलबाबत लिहण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याचे भारताशी असणारे नाते. या जगविख्यात लेखकाचे जन्मस्थान बिहारमधील मोतीहारी हे आहे. हा तोच आहे भाग जिथे गांधीनी नील उत्पादक शेतकऱ्यांचा चंपारण सत्याग्रह उभारला होता.

१९८४ : द माईलस्टोन
जॉर्ज ऑरवेल आपल्याला परिचित आहे तो त्याच्या जगप्रसिद्ध अशा ‘नाइन्टीन एटी फोर’ (१९८४) या कादंबरीमुळे. त्यानंतर अँनिमल फार्म हे त्याचे दुसरे सर्वात जास्त वाचले जाणारे पुस्तक. तसेच स्पॅनिश यादवी युद्धावरील होमेज टू कॅटोलोनिया हे पुस्तक आणि रोड टू वायगन पिअर, डाऊन अँण्ड आऊट इन पॅरिस अँण्ड लंडन, बर्मिस डेज ही त्याची इतर काही प्रमुख पुस्तके. तसेच त्याने वृत्तपत्रांतून विपुल प्रमाणात लेखन केले आहे. अनेक विषयांवरील आर्टिकल लिहली आहेत. ऑरवेल हा तसा लोकशाही समाजवादाचा पुरस्कार करणारा होता. त्याच्या साहित्यातून याबाबतचा त्याचा असलेला आग्रह लक्षात येतो.

अनुभवातून घडले विचार
ब्रिटिशांची वसाहत असलेल्या ब्रम्हदेशातील पोलिस खात्यात आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे काम करताना स्थानिकांवर होणारा अन्याय-अत्याचार त्याला पाहावला नाही. त्यामुळे ती नोकरी सोडून पत्रकार होण्यासाठी तो पुन्हा लंडनला माघारी गेला. कामगारांचे होणारे शोषण त्याने जवळून पाहिले होते. त्यामुळे त्याच्यावर साम्यवादी विचारधारेचा प्रभाव पडला. कामगारांचे जीवन जवळून पाहण्यासाठी तो विविध भागांत फिरला. तसेच साम्यवादाचा प्रसार करण्यातही तो आघाडीवर राहिला. १९३० च्या दशकात स्पेनमधील फ्रँकोच्या हुकुमशाही राजवटीविरोधातील क्रांतिकारी आंदोलनात लढण्यासाठी तो गेला होता. तेथील वास्तव्यात हुकुमशाही व्यवस्थांबाबत त्याला आलेल्या अनुभवातून त्याने लोकशाही समाजवादाचा जोरदार पुरस्कार करण्यास सुरवात केली. स्पॅनिश स्वातंत्र्य लढ्यातील कम्युनिस्ट आंदोलनाबाबत सोविएत युनियनच्या भुमिकांनुसार स्पॅनिश स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांच्या बदलणाऱ्या भुमिका, तेथील कम्युनिस्टांत असलेला लोकशाहीचा अभाव व स्पनेमधील ट्रॉस्ट्कीवादी आंदोलक कार्यकर्त्यांबाबत स्टालिनवादी कार्यकर्त्यांची वागणूक याने व्यथित होऊन त्याने लंडनला माघारी परतण्याचा निर्णय घेतला.

हुकूमशाहीचा टीकाकार
स्टॅलिनच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा तो मोठा टिकाकार होता. असे असतानाही त्याने समाजवादाचा मार्ग कधीच सोडला नाही हे ध्यानात घ्यावे लागेल. आज कम्युनिझमला विरोध करण्यासाठी ऑरवेलचा सर्रास वापर होत असला, तरी ऑरवेलने लोकशाही समाजवादाचा कायमच पुरस्कार केला होता हे विसरून चालणार नाही. साम्यवादातील हुकुमशाही आणि भांडवशाहीतील शोषण या दोन्हींना त्याचा विरोध होता. स्पॅनिश स्वातंत्र्य लढा सोडून लंडनला माघारी आल्यावर त्याने बीबीसी वृत्तसंस्थेसोबत काम करण्यास सुरवात केली. हा काळ होता, दुसऱ्या महायुद्धाचा. या महायुद्धात सुरू असलेल्या प्रपोगंडाबाबत त्याने लेखन केले. नाझीवाद, फॅसिझम, हुकुमशाही, स्टॅलिनवाद यांच्या विरोधाबरोबरच लोकशाहीसाठी युद्ध लढण्याचा देखावा करणाऱ्या ब्रिटन आणि अमेरिकेविरोधातही त्याने भुमिका घेतली. लोकशाहीचा पुरस्कार करणारी राष्ट्रेही गरज पडल्यास कशा पद्धतीने नागरी हक्कांची पायमल्ली करतात या विषयी त्याने अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.

‘बिग ब्रदर’ लक्ष ठेवतोय
ऑरवेलने राजकीय समाजव्यवस्थेवर प्रभावी भाष्य केले आहे. त्याने १९८४ मधून मांडलेल्या राज्याची कल्पना ही आज अस्तित्वात येत आहे हे दिसत आहे. त्याने या कादंबरीतून हुकुमशाही व्यवस्थेच्या अधीन होऊन तिचा गुलाम झालेल्या समाजाची मांडणी केली आहे. ती व्यवस्था लोकांचे सर्व अधिकार हिरावून घेते. या व्यवस्थेत नागरिकांवर सतत पाळत ठेवली जाते. तिची मुल्ये ही ‘युद्ध म्हणजेच शांतता, स्वातंत्र्य म्हणजेच गुलामी, अज्ञान हीच शक्ति’ यावर आधारित आहे. आज आपल्यावरही सतत पाळत ठेवली जात आहे. या कादंबरीतील ‘बिग ब्रदर’ २१ व्या शतकात आपल्यावर लक्ष ठेऊन आहे हे दिसत आहे. त्यासाठी सरकार नागरिकांची माहिती मिळवण्याची सर्व साधने हातात घेत आहे. आणि कंपन्याना नागरिकांवर पाळत ठेवण्यापासून कोणीही अडविताना दिसत नाहीये. तसेच आज लोकांच्यावर पाळत ठेऊन गोळा होणाऱ्या माहितीचा वापर सर्रास लोकांची मते वळविण्यासाठी, त्यांना वाकविण्यासाठी होत आहे. ही
ऑरवेलियन राज्याची सुरवात आहे. त्यामुळे ऑरवेल आजही प्रासंगिक आहेच.

अभिव्यक्तीचा पुरस्कर्ता
ऑरवेल व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आहे. तसेच लेखन कोणत्याही एका विशिष्ट विचारधारेला बांधिल नसावे अशी त्याची भुमिका आहे. विचारधारेला बांधिल राहून केलेल्या लेखानातून अभिव्यक्ती नष्ट होते. मानवी भावना आणि सत्याचा अभाव असलेले साहित्य रद्दीपेक्षा अधिक महत्त्वपुर्ण नसते अशी मांडणी तो करतो. सिनेमा आणि रेडिओ यातून मानवी मनाची विचार करण्याची प्रक्रिया बोथट होऊन आपल्यातील जिज्ञासा कमी होईल या मांडणीतून त्याचा दृष्टीकोन दिसतो. आज सिनेमातून दाखविली जाणारी अभिव्यक्ती ही वास्तवाचा विपर्यास करणारी आहे, याचा अनुभव येतच आहे. आणि किमान भारतातरी सिनेमामुळे कलात्मकता कशी रसातळाला चालली आहे हे जाणवतच आहे.

आताही विचार होतात लागू
हुकुमशहांकडून लेखकांच्या होणाऱ्या मुस्कटदाबीला विरोध करण्यासाठी तो शास्त्रज्ञांना लेखकांबरोबर येण्याचे आवाहन करतो. विज्ञाननिष्ठ समाज टिकविण्यासाठी हुकुमशाही व्यवस्था घालवणे ही गरज असल्याचे तो वारंवार सांगतो. जागतिक स्तरावर हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक सत्तेवर येत असताना शास्त्रज्ञांनाही भुमिका घ्यावीच लागेल हे या निमित्ताने अधोरेखित होते. त्याचे राजकिय लिखाण फक्त वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणारे उरत नसून ते भविष्यालाही मार्गदर्शक ठरते. त्यामुळेच तो काळाच्या पुढचा विचार करणारा लेखक ठरतो.

लेखक : अमर शैला
मो. 8055588295
(विद्यार्थी पत्रकार, वृत्तपत्रविद्या विभाग, पुणे विद्यापीठ)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*